गर्लफ्रेंडसोबत असताना युवकांची ‘हिरो’गिरी..!
By Admin | Updated: August 27, 2014 23:30 IST2014-08-27T22:02:00+5:302014-08-27T23:30:00+5:30
कास परिसर : पर्यटकांची धटिंगगिरी; स्थानिकांना त्रास अन् मारहाणही

गर्लफ्रेंडसोबत असताना युवकांची ‘हिरो’गिरी..!
सातारा : कास पठार म्हणजे पर्यटकांसाठी एक पर्वणीच आहे. पण, कास पठाराकडे जाताना अनेक पर्यटक हुल्लडबाजी करीत असतात. अनेकवेळा त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून स्थानिक नागरिकांना मारहाणीचाही प्रकार होत आहे. काही युवक तर गर्लफ्रेंडबरोबर येतात. रस्त्याच्या बाजूला बसूनच त्यांच्याकडून अश्लील चाळे सुरू असतात. अशा वेळी त्यांना हटकल्यावर त्यांच्यात ‘हिरो’गिरी संचारते. यामुळे स्थानिकांनी अशा प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. अशा हुल्लडबाजांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही त्यांच्याकडून होऊ लागली आहे.
कास पठार हे साताऱ्यापासून सुमारे २५ किमी अंतरावर आहे. कास पठार तसेच बामणोलीकडे सातारा जिल्ह्याबरोबरच राज्य तसेच पराराज्यांतूनही पर्यटक येत असतात. सध्या पावसाळ्याचे दिवस असून हजारो पर्यटकांची पावले कासकडे वळू लागली आहेत. सुटीच्या दिवशी तर हजारो पर्यटक येत असतात. हे पर्यटक कासकडे जाताना मध्येच अनेक ठिकाणी थांबतात. जागोजागी थांबून निसर्गाचे अनोखे रूप पाहतात. पण, त्यापैकी काहीं जणांकडून व विशेषत: करुन तरुणांकडून हुल्लडबाजीचे प्रकार घडतात. गावाच्या जवळ थांबून ओरडणे, रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांना अर्वाच्य भाषेत बोलणे, रस्त्याच्या कडेलाच अश्लील चाळे करणे असे प्रकार त्यांच्याकडून होत आहेत.
अशा घटना रोखण्यासाठी स्थानिक नागरिक त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात. पण, समोरच्या युवकाकडून स्थानिक नागरिकांना अपमानित व्हावे लागते. काही वेळा तर बाका प्रसंग उद््भवतो. संबंधित युवक नागरिकांना मारहाण करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. अशा घटना कास रस्त्यावर वारंवार घडू लागल्या आहेत.
काही युवक-युवती रस्त्याच्या बाजूच्या झाडांखाली बसून अश्लील चाळे करतात. जनावरांच्या पाठीमागे गेलेल्या ग्रामस्थांच्या नजरेस असे प्रकार येतात. त्यामुळे ग्रामस्थांना आपली जनावरे तेथेच सोडून दूर निघून जावे लागते.
अनेक वेळा शाळा सुटल्यानंतर घरी जात असलेल्या लहान मुलांच्या दृष्टीसही असे प्रकार पडतात. या प्रकारांमुळे सांस्कृतिक प्रदूषण वाढीस लागले असल्याने कासकडे जाणाऱ्या रस्त्यावर असे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांतून होत आहे. (प्रतिनिधी)