टंचाईतही अरबवाडी तलावातून बेसुमार पाणीउपसा
By Admin | Updated: February 29, 2016 00:59 IST2016-02-28T23:40:13+5:302016-02-29T00:59:19+5:30
वीजपुरवठा खंडीत करावा : महावितरणच्या मदतीने परवानाधारक शेतकऱ्यांची मनमानी

टंचाईतही अरबवाडी तलावातून बेसुमार पाणीउपसा
वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागातील नांदवळ धरणातील बेसुमार पाणी उपशानंतर आता याच परिसरातील अरबवाडी पाझर तलावातूनही परवानाधारक शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीसाठी पाणीउपसा करत आहेत. यामुळे गावावर पाण्याचे मोठे संकट निर्माण होणार आहे. प्रशासनाने पाणी उपशावर बंदी घालून महावितरणने या शेतकऱ्यांच्या मोटारींची वीजजोडणी खंडीत करावी, अशी मागणी अरबवाडी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील जवळपास ४७ गावातील शेती व माणसांची तहान भागवणाऱ्या तळहिरा, अरबवाडी व नांदवळ या तीन धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. सध्या दुष्काळाचे सावट या भागात दिसत आहे. अनेक गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. असे असतानाही या धरणातून पाणी उपशाला परवानगी दिली गेल्याने शासनाबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
अरबवाडी पाझर तलावात सध्या अत्यल्प पाणी शिल्लक आहे. या धरणातून शेतीसाठी पाणीउपसा करण्याचा अनेक शेतकऱ्यांकडे परवाने आहेत, मात्र सध्याच्या भीषण दुष्काळी परिस्थितीत या धरणातील पाणी उपसा झाल्यास आगामी ४ ते ५ महिन्यांच्या दुष्काळात लोकांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल. याशिवाय जनावरांच्या पाण्याचाही मोठा प्रश्न निर्माण होणार
आहे.
यासाठी आतापासूनच असलेले पाणी शिल्लक राहावे, अशी मागणी अरबवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे दिली आहे
यासाठी महावितरणला जबाबदार धरुन प्रशासनाने या ठिकाणी सुरु असलेल्या वीजपंपांचा वीजपुरवठा खंडित करावा, अशी प्रमुख मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. (वार्ताहर)
अरबवाडी, बनवडी, दुधनवाडी या गावांसाठी दुष्काळात आधार असलेल्या अरबवाडी धरणातून सध्या सुरु असलेल्या पाणीउपशाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन उपसाबंदी बंद करावी.
- तानाजीराव गोळे, चेअरमन,
अरबवाडी सोसायटी