गावाच्या प्रवेशद्वारातच बाटली उभी !
By Admin | Updated: January 2, 2015 23:59 IST2015-01-02T21:03:31+5:302015-01-02T23:59:31+5:30
कार्वेत ‘एन्ट्री’लाच दारू दुकान : ग्रामसभेत ठराव करूनही ‘उत्पादन शुल्क’ ढिम्म; कारवाई न झाल्यास आंदालनाचा इशारा

गावाच्या प्रवेशद्वारातच बाटली उभी !
कार्वे : गावाच्या सुरुवातीला बहुतांश ठिकाणी कमान असते. प्रवेशद्वार अथवा मंदिरेही असतात; पण कार्वेत चक्क बाटली उभी असल्याचे दिसते. या बाटलीमुळे तळीरामही गावाच्या प्रवेशद्वारातच झिंगत पडल्याचे पाहावयास मिळते. या सर्वाचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागतोय. एवढच नव्हे तर गावाच्या लौकिकालाही त्यामुळे गालबोट लागतंय.
कऱ्हाड तालुक्यात ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक वारसा लाभलेले गाव म्हणून कार्वे गावाचा लौकिक आहे. या गावाने शासनाच्या अनेक योजना, उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभागही नोंदविला आहे. निर्मलग्राम तसेच तंटामुक्त अभियानात गावाने पुरस्कार प्राप्त केला आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून गावाच्या लौकिकाला गालबोट लावण्याचा प्रकार होतोय. गावच्या प्रवेशद्वारावर शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा व महालक्ष्मीेचे मंदिर आहे. या मंदिरात देवदर्शनासाठी दररोज शेकडो ग्रामस्थ व महिला येत असतात. मात्र, या मंदिरापासून काही अंतरावरच बिअरबार व देशी दारूचे दुकान आहे.
कार्वे गावाच्या आसपास पाच-सहा मोठी गावे असून, या गावांचा कार्वे गावाशी दररोजचा संपर्क आहे. मात्र, गावाच्या प्रवेशद्वारातच तळीरामांचा अड्डा असल्याने बाहेरगावाहून येणाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.
गजबजलेल्या ठिकाणी तळीराम विनाकारण बडबड करीत अथवा हातवारे करीत उभे असलेले पाहावयास मिळतात. त्यांच्या या कृत्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनी तसेच महिलांना शरमेने मान खाली घालावी लागते.
काहीवेळा हे तळीराम पुतळा व मंदिराच्या आवारात पडलेले असतात़ त्यामुळे मंदिराचे पावित्र्यही धोक्यात येत आहे. याबाबत गावच्या ग्रामसभेत वेळोवेळी ठराव करण्यात आला आहे. संबंधित बार व दारूचे दुकान गावापासून दूर नेण्यात यावे, असा ठराव ग्रामसभेने घेतला आहे. ठरावाच्या प्रत प्रशासनालाही देण्यात आल्या आहेत. मात्र, त्याबाबत अद्याप कसलीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जातोय.
गाव तेथे पाणवठा, गाव तेथे शाळा, गाव तेथे मंदिर व गाव तेथे वाचनालय सर्वच ठिकाणी पाहायला मिळते; पण गावच्या प्रवेशद्वारातच दारूचे दुकान फक्त कार्वे गावात दिसते. वारंवार विनंती करूनही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थ प्रशासनावर कमालीचे नाराज आहेत. संबंधित बिअर बार व दारू दुकान इतरत्र हलविण्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मारुती बापू जाधव यांनी दिला आहे. (वार्ताहर)
कार्वे येथे प्रवेशद्वारात व मंदिरापासून फक्त पाच ते दहा फूट अंतरावर असलेला बिअरबार व दारूचे दुकान या परिसरातून हलावावे़ उत्पादन शुल्क विभागाने वेळोवेळी या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे़ याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार असून, त्यातूनही मार्ग न निघाल्यास आंदोलन करणार आहे.
-संतोष पाटील,
राज्याध्यक्ष, संभाजी ब्रिगेड
नशेत मुद्द्यावरून गुद्द्यावर
दारू दुकानात दररोज सायंकाळी मोठ्या प्रमाणात तळीरामांची गर्दी होते. आसपासच्या गावातील मद्यपीही येथे न चुकता दररोज हजेरी लावतात. दारूचे घोट घशात उतरले की मद्यपींना जोर चढतो. अगोदर हळू आवाजात बोलणाऱ्या या मद्यपींचा बाटली संपताच आवाज चढतो. मुद्द्यावरून ते गुद्द्यावर येतात. कधी-कधी या तळीरामांची भांडणे सोडविण्यासाठी ग्रामस्थांना मध्यस्थी करावी लागते.