केबल खोदाई ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:37 IST2021-03-20T04:37:58+5:302021-03-20T04:37:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : केबल टाकण्यासाठी केलेल्या खोदकामामुळे मलकापुरात महामार्गाच्या पूर्वेकडील उपमार्गाची चाळण झाली आहे. ...

केबल खोदाई ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे दोघे जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : केबल टाकण्यासाठी केलेल्या खोदकामामुळे मलकापुरात महामार्गाच्या पूर्वेकडील उपमार्गाची चाळण झाली आहे. खोदकाम केलेल्या ठिकाणी जागोजागी खड्डे पडल्याने व काढलेले चर व्यवस्थित न बुजवल्याने दगड-मातीचे ढीग पडले आहेत. या ढिगातील खडीमिश्रीत माती ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे उपमार्गावर पसरल्याने त्यावरुन घसरून दोन शाळकरी मुले जखमी झाली आहेत. येथून प्रवास करताना नाका-तोंडात धुरळा जात असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
मलकापुरातील उपमार्गातून खोदाई करत विविध कंपन्यांमध्ये ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी जणू स्पर्धाच लागली आहे. काही दिवसांपासून पूर्वेकडील उपमार्गावर चर काढून मिलिट्रीची ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम एका कंपनीला दिले आहे. संबंधित कंपनी उपठेकेदाराकडून हे काम करून घेत आहे. मात्र, या ठेकेदाराने हे काम करताना नियम धाब्यावर बसवले आहेत. चर खोदाईचे काम झाल्यानंतर चर व खड्डे केवळ माती व दगडाच्या सहाय्याने बुजवले जातात तर काही ठिकाणी उकरलेली माती आहे तशीच ठेवली जाते.
रात्रीच्यावेळी जेसीबीच्या सहाय्याने चर काढून केबल टाकून झाल्यानंतर खड्डे जेसीबीनेच बुजवतात. त्यामुळे अनेक ठिकाणी दगड व मातीचे ढीग तसेच पडलेले आहेत. तर केबलचा जोड असतो त्याठिकाणी चेंबरसाठी मोठा खड्डा तयार केला आहे. त्याला सुरक्षिततेसाठी केवळ पट्ट्या बांधल्या जातात. असे खड्डे रात्रीच्यावेळी धोकादायक ठरत आहेत. अनेक ठिकाणी हे खोदकाम केलेले चर बुजवण्यासाठी लावलेल्या ढिगातील खडीमिश्रीत माती ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे उपमार्गावर पसरल्याने सायकलसह दुचाकी घसरण्याच्या घटना घडत आहेत.
कोट
ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यावर दगड-माती पसरली आहे. त्यावरुन सायकल घसरल्याने दोन शाळकरी मुले गंभीर जखमी झाली आहेत. त्यापैकी एकाचा हात मोडला आहे. वाहनाच्या वर्दळीने उपमार्गालगतच्या व्यावसायिकांसह प्रवाशांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.
- नितीन काशिद-पाटील
शिवसेना तालुकाप्रमुख
चौकट
नेमकी नुकसानभरपाई कुणाकडे
मलकापुरातील महामार्गासह दोन्हीही उपमार्ग रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित आहेत. विविध कंपनीच्या केबल टाकण्याच्या कामाला संबंधित शासकीय विभाग किंवा पालिका यापैकी नेमके कोण परवानगी देते? या कामात झालेल्या रस्त्याच्या नुकसानभरपाईची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे.
चौकट
आरलेल्या चरीत अवजड वाहनाचे चाक खोलात ..
चर काढत केबल टाकली आहे. मात्र, साधारणपणे प्रत्येक शंभर मीटर अंतरात केबल जोडणीसाठी खोल खड्डे काढण्यात आले आहेत. हेच खड्डे धोकादायक बनले आहेत. रस्त्यातच काढलेले चर व खड्डे आरून अवजड वाहने अडकण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
फोटो :