मरणाच्या दारातून परतल्या दोघी!

By Admin | Updated: May 3, 2015 00:53 IST2015-05-03T00:52:13+5:302015-05-03T00:53:34+5:30

गीता अन् पूजा लागल्या चालू : ‘लोकमत’च्या हाकेला कण्हेरीच्या हॉस्पिटलने दिला हात

Both of them returned from the door of death! | मरणाच्या दारातून परतल्या दोघी!

मरणाच्या दारातून परतल्या दोघी!

राहुल तांबोळी ल्ल भुर्इंज
ओझर्डे, ता. वाई येथील स्फोटात गंभीरपणे भाजलेल्या व उपचारावाचून तडफडणाऱ्या गीता व पूजा या दोघींच्याही जीवाचा धोका आता टळला आहे. कण्हेरी, कोल्हापूर येथील सिद्धगिरी हॉस्पिटलच्या डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अफाट कष्टामुळे हे आश्चर्य घडले आहे. दोघींवर उपचारासाठी लाखो रुपये खर्च झाले असून, सर्व खर्च रुग्णालय ट्रस्टने स्वत:हून केला आहे.
ओझर्डे येथील यात्रेत शोभेची दारू उडवताना झालेल्या स्फोटात गीता रामदास पवार (वय ५) आणि पूजा रामदास पवार (९) या दोन्ही चिमुरड्या अनुक्रमे ८२ व ६७ टक्केभाजल्या होत्या. या दोघींवर एक दिवस जिल्हा रुग्णालयात उपचार झाले. तेथून त्यांना पुणे येथे ससून रुग्णालयात नेण्यास सांगितले होते. मात्र, नातेवाइकांनी या मुलींना फलटण तालुक्यातील तरडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.
तेथे अत्याधुनिक सुविधांची वानवा असल्याने उपचारांना मर्यादा होत्या. त्यामुळे तरडगाव येथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर दोघींना पुन्हा साताऱ्यास नेण्यात सांगितले.
गंभीर भाजलेल्या या चिमुरड्यांची त्याच अवस्थेत पुन्हा तरडगाव ते सातारा व साताऱ्यात पुन्हा पुण्याकडे बोट दाखविण्यात आल्याने सातारा ते तरडगाव अशी फरफट झाली. या दोघींची परिस्थितीच एवढी बिकट होती की, त्या वाचतील, असे कोणीच सांगत नव्हते. त्यामुळे या दोघींना तरडगावहून भिरडाचीवाडी, भुर्इंज येथील गोपाळवस्तीमध्ये पत्र्याच्या झोपडीत आणून ठेवण्यात आले. कोणत्याही उपचाराविना सलग चार दिवस या चिमुरड्या पाणी-पाणी म्हणत तडफडत होत्या. या घटनेचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच या दोघींवर उपचाराची कार्यवाही सुरू झाली.
कण्हेरी, कोल्हापूर येथील सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये जेव्हा या दोघींना दाखल केले गेले, तेव्हा तब्बल दहा दिवस उलटून गेले होते. या दहा दिवसांच्या फरफटीत या दोघींचे प्राण अक्षरश: कंठाशी आले होते. मात्र, सिद्धगिरी हॉस्पिटलचे वरिष्ठ प्लास्टिक सर्जन डॉ. रणजित गिरमे, जनरल सर्जन डॉ. लिमये आणि बालरोगतज्ञ डॉ. अमोल मोहिते व त्यांच्या टीमने दोघींवर दिवसरात्र कष्ट घेऊन उपचारांची पराकाष्ठा केली.
याबाबत माहिती देताना डॉ. अमोल मोहिते म्हणाले, ‘दहा दिवसांनी या दोघींना येथे दाखल केले. तेव्हा दोघींची प्रकृती अतिशय गंभीर होती. एक दिवस जरी उशीर झाला असता तर पूजाचे जगणे कठीण होते. पूजाच्या आतड्याला छिद्र पडले होते. मात्र त्याही गंभीर परिस्थितीत डॉ. रणजित गिरमे यांनी केलेली शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. अवघ्या काही दिवसांतच गीताच्या प्रकृतीचा धोका टळला तर पूजाची प्रकृतीही शुक्रवार, दि. १ मे रोजी नियंत्रणात आली आहे. दोघीही आता बोलत आहेत. त्यांच्या पायाला सूज असली तरी त्या मदतीने चालत आहेत. टीव्ही पाहत आहेत. तब्बल १५ दिवसांच्या उपचारांना यश आले असून, या दोघीही पूर्णपणे बऱ्या व्हाव्यात, यासाठी आणखी थोडा कालावधी जाईल. आता त्यांचे चेहरे पूर्वस्थितीत व्हावेत, यासाठी मोठी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या दोघींवर आधीपासूनच उपचार करणारे वरिष्ठ प्लास्टिक सर्जन डॉ. गिरमे हे ती शस्त्रक्रिया करणार आहेत.’

Web Title: Both of them returned from the door of death!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.