घरकुल योजनेसाठी लाच मागणार्या दोघांना अटक
By Admin | Updated: May 23, 2014 22:54 IST2014-05-23T22:51:03+5:302014-05-23T22:54:52+5:30
मेढ्यात कारवाई : तलाठ्यासह विस्ताराधिकार्याचा समावेश

घरकुल योजनेसाठी लाच मागणार्या दोघांना अटक
मेढा : जावळी तालुक्यातील निझरे येथील दारिद्र्यरेषेखालील इंदिरा आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्याला देण्यात आलेल्या शेवटच्या हप्त्यातील पाच हजारांची लाच मागितल्याप्रकरणी ग्रामसेवक बंडू गोमाजी तायडे व पंचायत समितीचे विस्ताराधिकारी शंकर मारुती साळुंखे यांना अटक झाली. याप्रकरणी निझरेचे जगन्नाथ धोंडिराम शिंदे यांनी फिर्याद दिली होती. अधिक माहिती अशी की, निझरे-मुरा येथील लक्ष्मीबाई जगन्नाथ शिंदे यांनी इंदिरा आवास योजनेंतर्गत घर बांधले आहे. या योजनेची रक्कम तीन हप्त्यांत देण्यात आली. याप्रकरणी तिसरा हप्ता जमा झाल्यानंतर ग्रामसेवक बंडू तायडे व विस्ताराधिकारी शंकर साळुंखे यांनी पाच हजारांची मागणी केली. फिर्यादी लक्ष्मीबाई शिंदे यांनी बँक आॅफ बडोदाच्या मेढा शाखेतील खात्यातील रक्कम जमा झाल्यानंतर देतो, असे सांगितले. त्यानंतर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार आज, शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे श्रीहरी पाटील, वैशाली पाटील व त्यांच्या सहकार्यांनी सापळा रचला. त्यानंतर मेढा येथील बँक आॅफ बडोदा शाखेत रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी या दोघांना अटक करण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. या घटनेमुळे जावळी तालुक्यात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)