कॅन्सरची औषधे देणाऱ्या बोगस डॉक्टरला सक्तमजुरी!
By Admin | Updated: June 15, 2016 00:03 IST2016-06-14T22:48:11+5:302016-06-15T00:03:16+5:30
पाचगणी : कॅन्सर, एड्सवर उपचार करतो म्हणून रुग्णांची फसवणूक

कॅन्सरची औषधे देणाऱ्या बोगस डॉक्टरला सक्तमजुरी!
महाबळेश्वर : ‘कॅन्सर तसेच एड्सवर आपण उपचार करतो,’ असे सांगून पैसे उकळणारा बोगस डॉक्टर शरद लिंबराज साळुंखे (वय ४५) यास महाबळेश्वर न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
पाचगणी येथील हनुमान रोड भागात शरद साळुंखे (मूळ रा. हिपारगारावा, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) हा २०१२ मध्ये एड्स व कॅन्सरसारख्या आजारांवर उपचार करतो, असे सांगून रुग्णांची फसवणूक करायचा. ‘तीन इंजेक्शन घ्या,’ असे सांगून प्रत्येक इंजेक्शनचे दहा हजार रुपये घेत होता. शरद साळुंखे याच्याकडे डॉक्टर असल्याचा कोणताही परवाना नसताना उपचाराच्या नावाखाली पैसे उकळत आहे, अशी सामाजिक कार्यकर्ते अशोक लिपारे यांना माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांना कळविली.
शरद साळुंखे हा विना परवाना उपचाराच्या नावाखाली फसवणूक करत असल्याची माहिती मिळाल्यावर जिल्हा एड्स नियंत्रण प्रतिबंधक विभागाचे डॉ. हेमंत भोसले, डॉ. अभिजित हनुमंत हौस्मनी, डॉ. शंकर सुतार व वैद्यकीय सहायक सरडे यांनी पाचगणी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांना दिली.
त्यानुसार पोलिस निरीक्षक बोकडे व नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी आशा राऊत यांनी एक पथक तयार करून साळुंखे याला सापळा रचून रंगेहाथ पकडले. त्यावेळी पोलिसांनी त्याच्याकडील स्पिरीट, कापूस, सिरिंज व विविध औषधाच्या बाटल्या, रुग्णांची नोंद असलेली डायरी ताब्यात घेतली होती.
या संबंधिची फिर्याद डॉ. शंकर सुतार यांनी १ आॅगस्ट २०१२ मध्ये पोलिसांना दिली. सरकारी वकील म्हणून बी. एन. पेटकर यांनी काम पहिले. सरकार पक्षाकडून नऊ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. न्यायाधीश प्र. अ. कुंभोजकर यांनी वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ कलम ३३ (१) नुसार आरोपी शरद साळुंखे याला तीन वर्षे सक्त कारावास व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली. (प्रतिनिधी)
एका इंजेक्शनला दहा हजार रूपये
एड्स, कॅन्सर बरा करतो, असे सांगून डॉ. शरद साळुंखे रुग्णांकडून एका इंजेक्शनसाठी दहा हजार रुपये घेत असे. अशी तीन इंजेक्शन्स तो येणाऱ्या रुग्णांना घेण्यास सांगत. अशा प्रकारे साळुंखे रुग्णांची फसवणूक करत असल्याचे उघड झाले होत.