वैराटगडाच्या पायथ्याशी आढळली हाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:44 IST2021-08-14T04:44:45+5:302021-08-14T04:44:45+5:30
पाचवड : पत्नी व प्रेयसीला यमसदनी धाडून पोलिसांना गुंगारा देणारा व्याजवाडी (ता. वाई) येथील संशयित आरोपी नितीन गोळे याला ...

वैराटगडाच्या पायथ्याशी आढळली हाडे
पाचवड : पत्नी व प्रेयसीला यमसदनी धाडून पोलिसांना गुंगारा देणारा व्याजवाडी (ता. वाई) येथील संशयित आरोपी नितीन गोळे याला भुईंज पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने पत्नीला ठार मारून मृतदेह वैराटगडाच्या पायथ्याशी पुरला असल्याची कबुली दिली. पोलिसांनी शुक्रवारी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मानवी हाडे, साडी, स्वेटर, बांगड्या असे साहित्य घटनास्थळी आढळून आले.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून वाई तालुक्यासह जिल्हा या दुहेरी हत्याकांडामुळे हादरून गेला आहे. मृत संध्या शिंदे हिच्या खूनप्रकरणी भुरइंज पोलिसांनी संशयित आरोपी नितीन गोळे याला कर्नाटकमधील बेळगाव येथून ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर त्याने पत्नी मनीषा गोळे हिचाही खून करून तिचा मृतदेह वैराटगडाच्या पायथ्याशी पुरल्याची कबुली दिली होती. त्यावरून पोलिसांनी गुरुवारी व शुक्रवारी घटनास्थळी जाऊन उत्खनन सुरू केले. घटनास्थळी मृत मनीषा गोळे हिची साडी, स्वेटर व बांगड्या तसेच काही मानवी हाडे आढळून आली आहेत. खोल दरी व पाण्यामुळे उत्खनन करताना अडचणी येत होत्या. दरम्यान, फॉरेन्सिक लॅब तज्ज्ञ व वैद्यकीय पथकाच्या तपासणीनुसार सापडलेल्या अवशेषामध्ये डोक्याची कवटी नव्हती. ती सापडावी यासाठी पोलीस व सह्याद्री ट्रेकर्स यांचे शुक्रवारी दिवसभर प्रयत्न सुरू होते.
संशयित आरोपी नितीन गोळे याची पत्नी मनीषा गोळे या हरवल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात अडीच वर्षांपूर्वी नोंद करण्यात आली होती. त्यामुळे हा तपास वाई पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
(चौकट)
महिला पोलीस अधिकाऱ्याची गरज :
भुरइंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोक्सो व महिलांच्या संदर्भात वाढत्या गुन्ह्यांची संख्या विचारात घेऊन सध्या बंद स्थितीत असलेले महिला पोलीस अधिकारी कक्ष त्वरित सुरू करणे गरजेचे बनले आहे. याकरिता येथे सक्षम महिला अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
फोटो : १३ पाचवड
वाई तालुक्यातील वैराटगडाच्या पायथ्याशी शुक्रवारी पोलीस व सह्याद्री ट्रेकर्सच्या जवानांनी खोदकाम केले. यावेळी मानवी हाडे व इतर वस्तू आढळून आल्या.
--------------------------------------------------
संपादकीय विभागासाठी सूचना-- या बातमीत भुरइंज हे नाव दुरुस्त करावे ही विनंती