कºहाड जेवढं संवेदनशील, तेवढंच सहनशीलही आहे..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:49 IST2019-06-29T22:49:40+5:302019-06-29T22:49:45+5:30
संजय पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क संवेदनशील शहर म्हणून कºहाड ओळखले जाते; मात्र संवेदनशील असण्याबरोबरच शहर सहनशीलही आहे, असं ...

कºहाड जेवढं संवेदनशील, तेवढंच सहनशीलही आहे..!
संजय पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
संवेदनशील शहर म्हणून कºहाड ओळखले जाते; मात्र संवेदनशील असण्याबरोबरच शहर सहनशीलही आहे, असं पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे सांगतात. गुन्हेगार आणि पोलीस दलाची भूमिका याविषयी त्यांच्याशी साधलेला हा संवाद.
प्रश्न : संवेदनशीलतेचा कलंक पुसण्यासाठी पोलीस दलाची भूमिका काय आणि कशी राहील?
उत्तर : कºहाडच्या गुन्हेगारीला इतिहास आहे. काही अनपेक्षित घटना येथे घडल्या आहेत. त्यानंतर पोलीस दलाने ठोस उपाययोजनाही केल्या आहेत. सध्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई आम्ही करीत आहोत. त्याचबरोबर सक्रिय टोळ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्याच्या हालचालीही सुरू आहेत.
प्रश्न : कºहाडात कोणत्या प्रकारचे गुन्हे वाढले आहेत?
उत्तर : उपविभागात मालमत्तेच्या गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. मात्र, शरीराविरुद्धचे गुन्हे काही प्रमाणात वाढले आहेत. मारामारीसारख्या घटनांची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याच्या सूचना त्या-त्या पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत. शरीराविरुद्धचा गुन्हा कितीही किरकोळ असला तरी भविष्यात तो गंभीर होऊ शकतो. त्यामुळे अशा गुन्ह्यांवर वेळीच अंकुश ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रश्न : गुन्हेगारीला पोषक ठरणाऱ्या अवैध धंद्यांना चाप लावण्यासाठीच धोरण काय?
उत्तर : कºहाड शहरासह उपनगरांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. या विभागात प्रत्येक क्षेत्राशी निगडीत नागरिकांचे वास्तव्य आहे. त्यामुळे साहजिकच काही ठिकाणी अवैध व्यवसायांना पोषक असे वातावरण तयार होते. मात्र, अवैध धंद्यांच्या माध्यमातून गुन्हेगारीला आर्थिक रसद मिळू नये, त्याचबरोबरच अवैध व्यवसाय फोफावूच नयेत, यासाठी कडक पावले उचलली जात आहेत. वारंवार त्यासाठी कोम्बिंग, सर्च आॅपरेशन राबविले जात आहे.
पालकांमध्ये जनजागृती व्हावी
सोशल मीडियाचा गैरवापर हा गुन्हा आहे. आणि किशोरवयीन तसेच युवकांकडून असे गुन्हे सध्या मोठ्या प्रमाणात घडत आहेत. सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी पालकांनी जागृत होणे गरजेचे आहे. आपला पाल्य स्वातंत्र्याचा अतिरेक करतोय का, यावर पालकांनी लक्ष ठेवावे.
पोलीसदीदी मैत्रीण बनतेय!
युवतींच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी पोलीसदीदी ही संकल्पना राबविण्यात आली होती. महिला पोलिसांचे मोबाईल क्रमांक त्यासाठी महाविद्यालयात दर्शनी भागावर लावले होते. सध्या अनेक युवती या महिला पोलिसांच्या मैत्रिणी बनल्या आहेत.
सुसंवाद वाढावा
कºहाड उपविभागात कौटुंबिक हिंसाचार आणि मारामारी यासारखे गुन्हे वारंवार घडत आहेत. हे गुन्हे पोलीस रोखू शकत नाहीत. त्यामुळे असे गुन्हे रोखण्यासाठी कुटुंबीयांनीच पुढाकार घेऊन कुटुंबात सुसंवाद वाढवावा. तरच असे गुन्हे कमी होतील.