वसना नदीवर २७ ठिकाणी बंधारे
By Admin | Updated: March 16, 2016 08:34 IST2016-03-16T08:25:06+5:302016-03-16T08:34:36+5:30
दुष्काळी भागाला दिलासा : पुनरुज्जीवनाचे काम प्रगतीपथावर

वसना नदीवर २७ ठिकाणी बंधारे
वाठार स्टेशन : वसना नदी पुनरुज्जीवनाचे काम सध्या प्रगतिपथावर असून, सोळशी ते पळशी दरम्यान बंधाऱ्यांची कामे वेगात सुरू आहेत. त्यामुळे दुष्काळी उत्तर कोरेगावच्या शेती व पिण्याचा पाणी प्रश्न मार्गी लागून जनतेला दिलासा मिळणार आहे. दरम्यान, या नदीवर २७ ठिकाणी बंधारे बांधण्यात येणार आहेत.
काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, अर्चना वाघमळे यांनी कामांची पाहणी केली. कामांचा दर्जा व गुणवत्ता याची सविस्तरपणे माहिती घेत त्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच ठेकेदार व ग्रामस्थांना महत्त्वाच्या सूचना केल्या. यावेळी भाजपचे दीपक पिसाळ, सुरेश निकम, संभाजी लेंभे, प्रमोद कदम, संजय साळुखे, प्रमोद खराडे, सदानाना साळुंखे, विद्याधर धुमाळ, रवींद्र जगताप, दादा देशमुख आदी उपस्थित होते.
वसना नदी पुनरुज्जीवन या महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी रा. स्व. संघाच्या जनकल्याण समितीने पाठपुरावा केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी १२.१५ कोटींचा निधी दिला. त्यापैकी ६.१२ कोटी मार्चअखेर खर्च करावयाचे असल्याने बंधाऱ्यांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. त्यामध्ये दहिगाव, घिगेवाडी, पिंपोडे, सोनके, नांदवळ, नायगाव व सोळशी येथील बंधारे समाविष्ट आहेत. (वार्ताहर)
तीन कामे पूर्ण होणार...
जलसंपदा विभागाच्या कण्हेर विकास विभागाच्या नियंत्रणाखाली होत असलेली ही कामे येणाऱ्या दोन-तीन महिन्यांत पूर्ण होतील, असा विश्वास नितीन पाटील यांनी व्यक्त केला. तसेच बंधाऱ्यांच्या या कामांमुळे भूजल पातळीत वाढ होऊन पाणी जादा दिवस टिकून राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे.
जलयुक्त शिवारच्या माध्यमातून कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागातील वसना नदीकाठच्या अनेक गावांचा पाणीप्रश्न संपणार आहे. या नदीवर सध्या २७ मोठे बंधारे बांधण्याचे काम सुरू आहे. या बंधाऱ्यांची कामे प्रगतीपथावर आहेत.
- दीपक पिसाळ,
पिंपोडे बुद्रुक