हायवेवर विवस्त्र अवस्थेत महिलेचा मृतदेह
By Admin | Updated: June 12, 2016 00:43 IST2016-06-12T00:43:56+5:302016-06-12T00:43:56+5:30
वाढेफाटा : अत्याचार करून खून केल्याची शक्यता; दोन दिवसांपूर्वी सापडलेल्या पुरुष मृतदेहाशी धागेदोरे शोधण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू

हायवेवर विवस्त्र अवस्थेत महिलेचा मृतदेह
सातारा : म्हसवे गावच्या हद्दीत बेवारस पुरुषाचा मृतदेह सापडल्याची घटना ताजी असतानाच वाढे फाट्यापासून जवळच एका हॉटेलच्या शेजारील सर्व्हिस रस्त्यावरील नाल्यात शनिवारी दुपारी २५ ते ३० वर्षीय महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दोन्ही मृतदेह पाचशे मीटरच्या अंतरावर सापडल्याने हा खुनाचा प्रकार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, या महिलेचा अत्याचार करून खून केला असावा, अशी पोलिसांना शंका आहे.
वाढेफाट्यापासून दोनशे मीटर अंतरावर एक हॉटेल आहे. या हॉटेलशेजारी असणाऱ्या झाडीतील नाल्यात एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दुपारी बारा वाजता सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्यासह त्यांची टीम तत्काळ घटनास्थळी पोहोचली. त्यांच्यासोबत महिला कर्मचारीही होत्या. संबंधित महिलेचा झाडीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. पूर्णपणे विवस्त्र अवस्थेत असल्यामुळे तिच्या अंगावर चादर टाकण्यात आली. महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी मृतदेहावर कोठे जखमा आहेत का, हे पाहिले. मात्र जखमा कोठेच आढळल्या नाहीत. त्यामुळे हा गळा आवळून खून असावा, अशी शक्यताही वर्तविण्यात आली. दोनच दिवसांपूर्वी या घटनास्थळपासून केवळ पाचशे मीटर अंतरावर एका पुरुषाचा मृतदेह आढळला होता. त्यामुळे या महिलेचा आणि त्या पुरुषाचा काही संबंध आहे का, याचे धागेदोरे शोधण्याचे प्रयत्न पोलिसांनी तत्काळ सुरू केले. सध्या या महिलेचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतरच अत्याचार झाला की नाही, नेमका मृत्यू कशामुळे झाला, याचा उलघडा होईल, असे पोलिसांनी सांगितले. सध्या तरी या घटनेची आकस्मात मृत्यू अशी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
श्वान जागीच घुटमळले !
झाडीमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी श्वानालाही पाचारण केले. संबंधित महिला विवस्त्र असल्यामुळे तिचे कपडे नेमके कोठे आहेत, हे शोधण्याचा श्वानाने प्रयत्न केला. मात्र श्वान घटनास्थळीच घुटमळले. त्यामुळे पोलिसांनी आजूबाजूचा परिसर अक्षरश: पिंजून काढला. परंतु कसलेही धागेदोरे सापडले नाहीत.
वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी
पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची गडचिरोलीला बदली झाल्याने त्यांचा पदभार अतिरिक्त पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्याकडे आहे. कलासागर यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी करून त्यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या.
बघ्यांच्या गर्दीने तपासात अडथळे !
महिलेचा मृतदेह सापडल्याची बातमी दुपारी बारा वाजता वाढे फाटा परिसरात वाऱ्यासारखी पसरली. काहीवेळातच परिसरातील बघ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. आजूबाजूने बघ्यांनी गर्दी केल्यामुळे श्वानही पुढे-मागे करत होते. अखेर पोलिसांना बघ्यांवर दंडुका उगारावा लागला. त्यानंतरच बघ्यांनी धूम ठोकली.
महिलेला अनेकांनी पाहिले होते !
गेल्या चार दिवसांपूर्वी संबंधित महिलेला वाढे फाटा परिसरात फिरताना अनेकांनी पाहिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा लोकांकडूनच ओळख पटविण्याच्या अनुषंगाने माहिती मिळू शकेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)