सातारा : कोयना धरणाच्या पात्रात मासेमारीसाठी होडीतून गेलेल्या एका व्यक्तीचा तोल जाऊन बुडून मृत्यू झाला होता. संबंधित व्यक्तीचा मृतदेह पाच दिवसांनंतर मंगळवारी सकाळी शोधपथकाच्या हाती लागला.कृष्णा धोंडिबा कदम (वय ४३, रा. आपटी, ता. जावळी) असे बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कृष्णा कदम हे ३ जानेवारी रोजी आपटी (ता. जावळी) गावच्या परिसरातील कोयना नदीच्या पात्रात होडी घेऊन मासेमारीसाठी गेले होते. त्यावेळी धरणात जाळे टाकताना त्यांचा होडीतून तोल गेला. ते नदीच्या पात्रात बुडाले. रात्री आठच्या सुमारास अंधार असल्यामुळे त्यांचा शोध लागला नाही. सलग पाच दिवस त्यांचा शोध घेतला जात होता. अखेर मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह कोयना नदीच्या पात्रात आढळून आला. याबाबत पांडुरंग धोंडिबा कदम (वय ४५, रा. आपटी, ता. जावळी) यांनी मेढा पोलिस ठाण्यात माहिती दिली होती. सहायक फाैजदार भिसे हे अधिक तपास करीत आहेत.
Satara: ‘कोयना’त बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह पाच दिवसांनी सापडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 12:25 IST