बेपत्ता कुटुंबातील पतीचा मृतदेह कास तलावाजवळ
By Admin | Updated: May 3, 2015 00:53 IST2015-05-03T00:52:37+5:302015-05-03T00:53:41+5:30
तपासाला वेग : दुचाकी सापडली; पत्नी, मुलींचा शोध सुरू

बेपत्ता कुटुंबातील पतीचा मृतदेह कास तलावाजवळ
मेढा : जावळी तालुक्यातील रायगाव येथून अचानक बेपत्ता झालेल्या कुटुंबातील पतीचा मृतदेह कास तलावापासून शंभर मीटर अंतरावर आढळून आला असून, पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलींचा शोध अद्याप जारी आहे. तलावापासून जवळच या कुटुंबाची दुचाकी आढळून आल्यावर या तिघांच्या शोधकार्याला वेग आला.
रायगाव येथून २० एप्रिलला बेपत्ता झालेल्या या कुटुंबातील प्रवीण धनाजी नावडकर (वय ३५) यांचा मृतदेह कासजवळ आढळून आला आहे. त्यांच्यासोबत पत्नी नूतन प्रवीण नावडकर (वय ३१), मुलगी श्रावणी (वय ४) आणि समृद्धी (वय ५) हे तिघे बेपत्ता झाले होते. या तिघांचा शोध अद्याप लागलेला नसून, कास ग्रामस्थांच्या मदतीने हा परिसर पिंजून काढण्यात येत आहे. घनदाट जंगलाने वेढलेला हा परिसर असल्याने शोधकार्य कठीण झाले आहे.
नातेवाइकांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी सोमवार, (दि. २० एप्रिल) सकाळी साडेअकराच्या सुमारास हे चौघेजण दुचाकीवरून (एमएच ११ बीयू ९९२२) कळमवाडी येथे जाण्यास निघाले होते. तेव्हापासून ते परत आलेच नाहीत. प्रवीण नावडकर यांचे वडील धनाजी यांनी २१ एप्रिल रोजी भुर्इंज पोलीस ठाण्यात मुलगा, सून व दोन नाती बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली होती. दरम्यान, कास-बामणोली रस्त्यावर कास तलावापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर नावडकर यांची दुचाकी बेवारस स्थितीत आढळून आली. या दुचाकीपासून जवळच ‘घरगुती कारणातून आम्ही आत्महत्या करीत आहोत,’ असा मजकूर असलेली चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीच्या आधारे परिसरात पोलिसांनी शोधकार्य सुरू केले. शनिवारी (दि. २) दुपारच्या सुमारास प्रवीण नावडकर यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी आत्महत्या कशी केली, याबाबत शवविच्छेदनानंतरच माहिती मिळू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.
पत्नी नूतन तसेच श्रावणी आणि समृद्धी या दोन्ही मुलींचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरूच होते.
मेढा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून, सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाटील तपास करीत आहेत.