अपहृत बालकाचा मृतदेह विहिरीत
By Admin | Updated: November 23, 2015 00:32 IST2015-11-22T22:05:28+5:302015-11-23T00:32:47+5:30
घातपाताचा संशय

अपहृत बालकाचा मृतदेह विहिरीत
लोणंद : फलटण तालुक्यातील रावडी खुर्द येथील अपहरण झालेल्या अजय आबा बनसोडे (वय ६) या बालकाचा मृतदेह घरापासून जवळच असलेल्या विहिरीत आढळला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हा घात की अपघात याविषयी गूढ वाढले आहे.अजय बनसोडे हा शुक्रवार, दि. २० रोजी संध्याकाळी घरासमोर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता. त्याचे अज्ञातांनी अपहरण केले असल्याची फिर्याद वडील आबा बनसोडे यांनी लोणंद पोलीस ठाण्यात दिली होती. अजय हा शेजारी असलेल्या जागरण, गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये जेवल्यानंतर घरी आला नव्हता. त्याचा सर्वत्र शोध घेतला तरी तो सापडला नाही.
दरम्यान, रविवारी सकाळी बनसोडे यांच्या घरापाठीमागील पाचशे मीटरवरील शंकर हाके यांच्या विहिरीमध्ये अजयचा मृतदेह सापडला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. सहायक पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने अजयचा मृतदेह विहिरीबाहेर काढला. लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अजयच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
अजयचा खून झाला की तो खेळता-खेळता विहिरीत पडला, याबाबत गूढ असून, पोलीस त्या दृष्टीनेही तपास करीत आहेत. (वार्ताहर)