कोरेगावात बाचल-बर्गेंचा जोर
By Admin | Updated: April 24, 2015 01:10 IST2015-04-24T01:08:46+5:302015-04-24T01:10:13+5:30
ग्रामपंचायत निवडणूक : सातारारोडला काँग्रेसची सरशी

कोरेगावात बाचल-बर्गेंचा जोर
कोरेगाव : कोरेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे किशोर बाचल आणि काँग्रेसचे किरण बर्गे यांच्या नेतृत्वाखालील श्री भैरवनाथ ग्रामविकास आघाडीने नऊ जागांवर विजय संपादन करीत सत्ता हस्तगत केली आहे. भैरवनाथ पॅनेलला सात जागा मिळाल्या असून, एका जागेवर अपक्ष विजय झाला आहे. त्यामुळे कोरेगावने पक्षविरहित राजकारणाची परंपरा यंदाही जपली आहे.
कोरेगाव तहसील कार्यालयात गुरुवारी सकाळी दहा वाजता निवासी नायब तहसीलदार निवास ढाणे, महसूल नायब तहसीलदार रवींद्र रांजणे, श्रीरंग मदने व निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मतमोजणीस प्रारंभ झाला.
पंचायत समितीचे माजी सभापती संजय झंवर, विद्यमान उपसरपंच प्रतिभा बर्गे, अॅड. प्रभाकर बर्गे व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ पॅनेलला सात जागा मिळाल्या आहेत. भैरवनाथ वॉर्ड क्र. ४ मधून अपक्ष उमेदवार राहुल रघुनाथ बर्गे हे विजयी झाले आहेत. सरपंचपद अनुसूचित जमातीच्या महिला संवर्गासाठी राखीव आहे. या जागेवर आघाडीच्या विद्या येवले विजयी झाल्या. १७ पैकी २ उमेदवार यापूर्वीच बिनविरोध झाले होते. विद्यमान तीन सदस्य पुन्हा एकदा ग्रामपंचायतीत प्रवेश करीत आहेत.
जुनीपेठ वॉर्ड क्र. १ मधून सुमन बर्गे, अलका बर्गे व शांताबाई बर्गे यांनी माघार घेतल्याने नीता शंकरराव बर्गे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. हनुमान वॉर्ड क्र. ३ मधून मीना बर्गे यांनी माघार घेतल्याने मंदा किशोर बर्गे यांची बिनविरोध निवड झाली. या दोघी भैरवनाथ ग्रामविकास आघाडीच्या असल्याने आघाडीने विजयाचा श्रीगणेशा केला होता.
मतदानावेळी किरकोळ वादाचे प्रकार घडल्याने मतमोजणीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. जुनीपेठ वॉर्ड क्र. १ मधून भैरवनाथ आघाडीने दोन्ही जागांवर विजय मिळविल्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर आझाद चौक वॉर्ड क्र. २ मध्ये भैरवनाथ पॅनेलने तिन्ही जागांवर विजय मिळविल्याने कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत विजयी घोषणा देण्यास सुरुवात केली.
मतांची संख्या व एकूण आकडेवारीवरून आघाडी व पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. निवास ढाणे यांनी त्यांच्या शंकेचे निरसन केल्यानंतर पुढील मतमोजणीस सुरुवात झाली. पोलीस निरीक्षक प्रकाश धस व सहायक पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (प्रतिनिधी)