बसस्थानकाच्या डबक्यात ‘बोटी’
By Admin | Updated: May 11, 2015 00:46 IST2015-05-11T00:46:38+5:302015-05-11T00:46:53+5:30
मनसेकडून खड्ड्यांचा अनोखा पंचनामा : आठ दिवसांची मुदत

बसस्थानकाच्या डबक्यात ‘बोटी’
कऱ्हाड : येथील एसटी बसस्थानकात पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांचे तसेच एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत कऱ्हाड आगारातील अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही त्यांच्याकडून काहीच कार्यवाही केली जात नसल्याचे सांगत रविवारी मनसे पदाधिकाऱ्यांनी बसस्थानकात आंदोलन केले. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी स्थानकातील खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्यात कागदापासून तसेच कृत्रिम पद्धतीने तयार करण्यात आलेल्या बोटी सोडून आंदोलन केले. बसस्थानक आगार प्रमुखांनी स्थानकातील खड्ड्यांची आठ दिवसांत दुरुस्ती केली नाही तर तीव्र स्वरूपात आंदोलन क रण्यात येईल, असा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार, जिल्हा उपाध्यक्ष महेश जगताप, तालुका अध्यक्ष दादासाहेब शिंगण, नितीन महाडिक, शहराध्यक्ष सागर बर्गे, चंद्रकांत पवार, स्वरूप निकम, प्रवीण गायकवाड, सागर जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
एक महिन्यापूर्वी एस. टी. बसस्थानकामध्ये पडलेले खड्डे मुजवण्यात यावेत, असे मनसे पदाधिकाऱ्यांनी आगार प्रमुखांना निवेदन दिले होते. त्याबाबत येथील आगार प्रमुख व महामंडळ प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही, तसेच याबाबत दखल घेतली गेली नाही. त्यामुळे बसस्थानक परिसरात मोठ्या
प्रमाणात खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे.
शनिवारी पडलेल्या पावसाच्या पाण्यामुळे बसस्थानकातील खड्ड्यात तळे निर्माण झाले. स्थानकातील खड्ड्यांमुळे येथील प्रवाशांना होत असलेल्या त्रासाची दखल घेत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानकात साठलेल्या खड्ड्यातील पाण्यात रविवारी खेळण्यातील कृत्रिम बोटी सोडल्या. तसेच कऱ्हाड
बसस्थानक प्रमुख थोरात यांना धारेवार धरले असता अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर स्थानकातील पडलेले खड्डे मुजवण्यात येतील, असे
आश्वासन दिल्याने मनसेने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. (प्रतिनिधी)