मास्क न लावणाऱ्या १०७ कर्मचाऱ्यांना पालिकेचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:36 IST2021-03-28T04:36:34+5:302021-03-28T04:36:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : साताऱ्यातील विसावा नाका येथील पामासो इंटरनॅशनल कंपनीला पालिका व पोलीस दलाने शनिवारी चांगलाच दणका ...

मास्क न लावणाऱ्या १०७ कर्मचाऱ्यांना पालिकेचा दणका
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : साताऱ्यातील विसावा नाका येथील पामासो इंटरनॅशनल कंपनीला पालिका व पोलीस दलाने शनिवारी चांगलाच दणका दिला. मास्क न लावता वावरणाऱ्या कंपनीच्या १०७ कर्मचार्यांकडून पथकाने २१ हजार ४०० तर फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३ हजार असा एकूण २४ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला.
सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तरीही अनेक नागरिक, दुकानदार, व्यापारी, विक्रेते मास्कचा वापर करत नसल्याचे व फिजिकल डिस्टन्स पाळत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. ही बाब कोरोना वाढीसाठी कारणीभूत ठरत असल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश पालिका व पोलीस प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार गेल्या १५ दिवसांपासून पालिका व पोलीस दलाने संयुक्त कारवाई सुरू केली आहे.
येथील विसावा नाका परिसरात असलेल्या पामासो इंटरनॅशनल मार्केटिंग कंपनीची पालिकेचे कोरोना विभागप्रमुख प्रणव पवार, अतिक्रमण विभाग प्रमुख प्रशांत निकम यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी शनिवारी अचानक पाहणी केली. यावेळी कंपनीतील १०७ कर्मचारी विनामास्क वावरताना आढळून आले. तसेच फिजिकल डिस्टन्सचेही संबंधितांकडून उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे पथकाने मास्क न लावणाऱ्या १०७ कर्मचार्यांकडून प्रती २०० असा २१ हजार ४००, तर फिजिकल डिस्टन्सप्रकरणी तीन हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.