कलेढोण शिवारात महिलेचा खून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2016 01:09 IST2016-06-02T01:09:51+5:302016-06-02T01:09:51+5:30

लाखाचे दागिने लंपास : अज्ञात व्यक्तीकडून डोक्यात कुऱ्हाडीने वार

Blood of the woman in Khedhon Shivar | कलेढोण शिवारात महिलेचा खून!

कलेढोण शिवारात महिलेचा खून!

मायणी : खटाव तालुक्यातील कलेढोण येथे शेतात गाय चारणाऱ्या एका शेतकरी महिलेवर अज्ञात व्यक्तीने कुऱ्हाडीने वार करून तिला जागीच ठार केले. त्यानंतर तिचे मंगळसूत्र, कर्णफुले अन् पैंजण असे जवळपास एक लाख रुपयांचे दागिनेही लंपास केले. या घटनेची नोंद वडूज पोलिस ठाण्यात झाली आहे.
घटनास्थळ व पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कलेढोण येथील शकुंतला बबन कणसे (वय ४७) या बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास गावालगतच्या शेतात नेहमीप्रमाणे गाय व वासरू चारायला घेऊन गेल्या होत्या, तर त्यांचे पती गाडी दुरुस्तीसाठी मायणीला गेले होते.
संध्याकाळी घरी आल्यानंतर आपली पत्नी दिसली नाही म्हणून ते शेतात गेले. त्यावेळी पत्र्याच्या शेडजवळील झाडाखाली पत्नीचा रक्ताळलेला मृतदेह त्यांना आढळून आला.
ही घटना समजताच गावकऱ्यांनीही तातडीने पोलिसांना बोलावून घेतले. झाडाखाली विश्रांती घेत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला असावा व त्यानंतर मंगळसूत्र, कर्णफुले अन् पैंजण, आदी सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
शकुंतला यांची दोन मुले गलाई व्यवसायानिमित्त कर्नाटकमध्ये आहेत. तर शेताची कामे दोघे पती-पत्नी करतात. अधिक तपास पोलिस अधिकारी प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल संजय देवकुळे करीत आहेत. (वार्ताहर)
रक्ताळलेली कुऱ्हाड विहिरीत !
गावापासून केवळ पाच मिनिटांच्या अंतरावरच कणसे यांचे शेत असून, दुपारी या परिसरात नेमका कोणा-कोणाचा वावर होता, याचाही पोलिस कसून शोध घेत आहेत. दरम्यान, गुन्ह्यात वापरण्यात आलेली रक्ताळलेली कुऱ्हाड गावाच्या रस्त्यालगत असलेल्या ३०० फूट अंतरावरील विहिरीत सापडली.

Web Title: Blood of the woman in Khedhon Shivar