लोखंडी रॉड डोक्यात मारून युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 23:29 IST2018-05-06T23:29:52+5:302018-05-06T23:29:52+5:30

लोखंडी रॉड डोक्यात मारून युवकाचा खून
सातारा : न्यायालयात सुरू असलेला खटला मागे घेण्यावरून साताऱ्यातील मंगळवार तळे परिसरात शनिवारी मध्यरात्री युवकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना घडली.
संदीप रमेश भणगे (वय ३२, रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी प्रसाद ऊर्फ पायलट प्रकाश कुलकर्णी (३५, रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) याला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गेल्या काही वर्षांपूर्वी संदीप भणगे व प्रसाद कुलकर्णी यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती. यात प्रसादने केलेल्या मारहाणीत संदीपच्या हात व पायाला गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात २०१२ मध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
जिल्हा व सत्र न्यायालयात या प्रकरणाचा सध्या खटला सुरू आहे. हा खटला मागे घेण्यासाठी प्रसाद संदीपवर दबाव टाकत होता. त्यास संदीप नकार देत होता. दरम्यान, शनिवारी सकाळी संदीप घरातून बाहेर पडला. मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने संदीपचे वडील रात्री एकच्या सुमारास मंगळवार तळे परिसरात त्याला पाहण्यासाठी गेले. तेव्हा प्रसाद व संदीप या दोघांमध्ये वाद सुरू होता. रागाच्या भरात प्रसादने संदीपच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. यात संदीपच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रसादने घटनास्थळावरून पळ काढला.
शाहूपुरी पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. रमेश विठ्ठल भणगे (६५, व्यंकटपुरा पेठ) यांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करून संशयीत आरोपीच्या शोधार्थ पथके रवाना झाली. काही तासांमध्येच आरोपी प्रसाद कुलकर्णीला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ करीत आहेत.