रक्ताचं नातंच सांगणार सांगाड्याची ओळख!
By Admin | Updated: August 19, 2016 00:16 IST2016-08-18T23:57:24+5:302016-08-19T00:16:31+5:30
शास्त्रोक्त पुराव्यांचं जाळ : ‘डीएनए’ जुळताच पटणार खात्रीशीर ओळख; पोळभोवती अजूनही संशयाचं वलय

रक्ताचं नातंच सांगणार सांगाड्याची ओळख!
संजय पाटील -- कऱ्हाड -वाई तालुक्यातील धोमचं हत्याकांड थरारक वळणावर पोहोचलं असतानाच संतोष पोळ भोवती पुराव्यांचं जाळ विणण्याचं काम पोलिस पथकाकडून सुरू आहे. या हत्याकांडात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळविण्यासह शास्त्रोक्त पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पोळने गाडलेल्या प्रत्येक मृतदेहाचा ‘व्हिसेरा’ राखून ठेवला जातोय. तसेच सांगाड्याची ओळख पटविण्यासाठी कोल्हापूर व पुण्याच्या पथकाने ‘डीएनए’चे नमुनेही संकलित केले आहेत.
बेवारस मृतदेह पोलिसांसाठी नवीन नाहीत. अनेकवेळा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्थितीत बेवारस मृतदेह आढळून येतात. त्या मृतदेहांची ओळख पटविण्यासाठीची कार्यपद्धती ठरलेली असते. बेवारस मृतदेह आढळल्यास सुरुवातीला पोलिस त्याठिकाणी जाऊन मृतदेहाचा पंचनामा करतात़ संबंधिताकडे एखादा ओळखीचा पुरावा आहे का? याची पोलिसांकडून खातरजमा केली जाते़ तसेच घटनास्थळीच मृतदेहाची ओळख पटविण्याचाही प्रयत्न होतो़ त्यानंतर संबंधित मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवितात़ संबंधिताचा मृत्यू नैसर्गिक असेल तर शवविच्छेदनानंतर पुढील कार्यवाही केली जाते; मात्र मृत्यू संशयास्पद असेल तर शवविच्छेदन अहवालाबरोबरच ‘व्हिसेरा’ही राखून ठेवला जातो. संबंधिताच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यास ‘व्हिसेरा’ची मदत होते. तसेच अनेकवेळा संशयास्पद मृत्यू झालेल्याचे ‘डीएनए’ नमुनेही संकलित करून ठेवले जातात. ज्याचा मृतदेहाची ओळख पटविण्यास फायदा होतो. शासकीय रुग्णालयांमध्ये तीन ते सात दिवस मृतदेह सुस्थितीत राहू शकेल, अशा क्षमतेचे शीतग्रह असते. या सात दिवसांच्या कालावधीत पोलिस संबंधिताची ओळख पटविण्याचा प्रयत्न करतात़ ओळख पटल्यास तो मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येतो; पण ओळख न पटल्यास सात दिवसांनंतर संबंधित आरोग्य विभागामार्फत मृतदेहावर अंत्यसंस्कार येते़ अंत्यसंस्कारानंतरही मृतदेहाचे कपडे व साहित्य पोलिस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षाकडे जमा असते.
धोमच्या प्रकरणात मात्र मृतदेहाची तोंडी ओळख पटली आहे. मृतदेहाच्या हाडांचा सांगाडाच शिल्लक असल्याने ओळख पटविण्यात अनेक अडचणी येत आहेत. संतोष पोळने ज्याठिकाणी मृतदेह पुरले होते, तो परिसर पोलिसांनी खोदला आहे. ओळख पटविण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. मंगल जेधे यांचे एटीएम कार्ड, बँकेचे पासबुक तसेच इतर वस्तूही पोलिसांना सापडल्या आहेत. मृतदेहांची ओळख पटण्यासाठी पोलिसांनी ‘डीएनए’ तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सुरुवातीला कोल्हापूर येथील पथक बोलविण्यात आले होते. त्यानंतर पुण्यातील पथकानेही घटनास्थळी येऊन ‘डीएनए’साठीचे नमुने घेतले आहेत. ‘डीएनए’ चाचणीनंतर सांगाड्याची खात्रिशीर ओळख पटणार आहे. रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचं रक्तच ही ओळख पटविणार आहे.
‘डीएनए’ने म्हणजे काय?
‘डिआॅक्सिरायबो न्यूक्लिक’ हे मानवी शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या केंद्रबिंदूमधील एक प्रकारचे आम्ल आहे. त्यालाच ‘डीएनए’ म्हटले जाते.
या आम्लामध्ये त्या जीवाबद्दलची माहिती साठवून ठेवलेली असते. ही माहिती एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जाणाऱ्या गुणदोषांना कारणीभूत असते. ही माहिती केंद्रबिंदूत २३ जोड्या असलेल्या गुणसूत्रांद्वारे साठवली जाते.
गुणसूत्रांच्या प्रत्येक जोडीत एक गुणसूत्र पित्याकडून व एक मातेकडून येतो. मानवी शरीर रचनेत स्वरूप ठरवण्यात हे महत्त्वाचे घटक असतात. रूप, रंग, बुद्धिमत्ता, कौशल्य, डोळ्याचा रंग, आकार, रूप, कातडीचा रंग हे सर्व घटक गुणसूत्रे ठरवतात.
गुणसूत्रांच्या आधारे ‘डीएनए’ चाचणीतून व्यक्तीची ओळख करता येते. न्यायसहायक शास्त्रात याचा उपयोग होतो. प्रत्येक व्यक्तीच्या सेल न्यूक्लिअसमध्ये ‘डीएनए’ आढळते.
आई, वडील, मुलगा, मुलगी यांचे ‘डीएनए’ ठसे सम प्रमाणात आढळतात. सावत्र मुलाचे ठसे वेगळे असतात. आयडेन्टिकल जुळ्यांमध्ये ‘डीएनए’ ठसे एकसारखेच असतात. ‘डीएनए’ टेस्ट करताना व्यक्तीच्या रक्त, केस, वीर्य आदी नमुन्यातून ‘डीएनए’ वेगळे केले जातात.
‘फोरेंसिक’ पुराव्यावर पोलिसांचा भर
संतोष पोळ हा ‘कोल्ड माइंड सिरिअल किलर’ आहे. तसेच यापूर्वी त्याने अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांनाच अडचणीत आणून त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पोलिस पथक त्याच्याभोवती शास्त्रोक्त पुराव्यांचं जाळं विणतंय. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पद्माकर घनवट व पोलिस उपनिरीक्षक रमेश गर्जे या अधिकाऱ्यांमार्फत हा तपास सुरू आहे. उपनिरीक्षक रमेश गर्जे यांनी या प्रकरणात पोळविरोधरात अनेक पुरावे संकलित केले असून, ते ‘फोरेंसिक’ तपासणीसाठी पाठविले आहेत.
‘डीएनए’साठी लागतं
रक्ताचं नातं
‘डीएनए’ तपासणीसाठी मृत व्यक्तीच्या रक्तातील नातेवाइकाच्या रक्ताचे नमुने संकलित केले जातात. रक्तातील नात्याव्यतिरिक्त इतर कोणाचाही ‘डीएनए’ मृत व्यक्तीच्या ‘डीएनए’शी जुळत नाही. पती आणि पत्नी रक्ताच्या नात्यात येत नाहीत. आई, वडील, भाऊ, मुलगा किंवा मुलगी यांच्या रक्ताचे नमुने ‘डीएनए’साठी घेतले जातात.