स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

By Admin | Updated: June 30, 2014 23:56 IST2014-06-30T23:53:26+5:302014-06-30T23:56:59+5:30

‘लोकमत’चा उपक्रम : साताऱ्यात जिल्हा रुग्णालयात उद्या आयोजन

Blood Donation Camp for Late Jawaharlalji Darda Jayanti | स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

सातारा : ‘लोकमत’चे संस्थापक, संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूह गेल्या वर्षीपासून संपूर्ण राज्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन करीत आहे. यावर्षीही बुधवार, दि. २ जुलै रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेत सातारच्या जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
रक्तदान हे महान पुण्यदान मानले जाते. रक्ताची गरज ही कोणत्याही व्यक्तीस केव्हाही लागू शकते. रक्त हे मानवी शरीरात तयार होते आणि त्याची गरज फक्त मानवालाच आहे. अडीअडचणीच्या वेळी माणुसकीच्या नात्याने रक्तदान करणारी व्यक्ती परमेश्वरच मानली गेली आहे. हे महत्त्व लक्षात घेऊनच हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.
राजकारण, समाजकारण आणि पत्रकारिता करताना ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांनी संपूर्ण जीवनभर लोककल्याण हे मूल्य केंद्रस्थानी ठेवले. त्यांच्या जयंतीनिमित्त याच मूल्यांची जपणूक करण्यासाठी ‘लोकमत’ परिवाराने संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात जमा होणाऱ्या रक्तातून अनेकांच्या जीवनात संजीवनी मिळण्यास मदत होणार आहे. स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या कार्याचा वारसा चालविण्याचा हा एक प्रयत्न आहे. यात समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे आणि रक्तदानाचे पुण्य मिळवावे, असे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९७६२५२७१०२ आणि ९०११३९७७९५ या क्रमांकांवर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)

Web Title: Blood Donation Camp for Late Jawaharlalji Darda Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.