कऱ्हाडात शेतकरी संघटनांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:36 IST2021-02-07T04:36:21+5:302021-02-07T04:36:21+5:30
गत दोन महिने दिल्ली येथे कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याची दखल सरकार घेत नाही. उलट आंदोलकांवर अन्याय, ...

कऱ्हाडात शेतकरी संघटनांचा रास्ता रोको
गत दोन महिने दिल्ली येथे कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याची दखल सरकार घेत नाही. उलट आंदोलकांवर अन्याय, अत्याचार सुरू आहे, असा आरोप शेतकरी संघटनांचा आहे. म्हणूनच विविध शेतकरी संघटनांनी शनिवारी दुपारी बारा वाजता कोल्हापूर नाका येथे रास्ता रोको आंदोलन केले.
यावेळी कॉ. माणिक अवघडे, माणिकराव जाधव, अनिल घराळ, पंजाबराव पाटील, साजीद मुल्ला, अॅड. समीर देसाई आदींनी उपस्थित शेतकऱ्यांसमोर मनोगत व्यक्त करीत केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेतला. सरकारने हे कायदे त्वरित मागे घ्यावेत, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशिला चव्हाण सहभागी झाल्या होत्या. कऱ्हाड- पंढरपूर रस्त्यावर आंदोलकांनी बराच वेळ ठिय्या मांडला होता. पोलिसांनी विनंती करूनही आंदोलक रस्त्यावरून हटत नाहीत, हे लक्षात येताच त्यांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस गाडीतून शहर पोलीस ठाण्यात आणले.
दरम्यान, कायदा व सुव्यवस्था चांगली राहावी, यासाठी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील यांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
- कोट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऊस कसा लावतात, त्याला डोळे असतात, किती महिने पीक घ्यावे लागते, शेतकऱ्यांना त्यासाठी काय त्रास होतो, त्याला पैसे किती मिळतात यातील काहीच माहीत नाही. ते कृषी कायदे बदलून चांगले असल्याचे सांगतात. ही बाब दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांनी स्वत:पुरतेच अन्नधान्य पिकवले तर तुम्ही खाणार काय? त्यामुळे उद्योजकांच्या नव्हे तर शेतकऱ्यांच्या फायद्याचे कायदे आणणे गरजेचे आहे.
- सत्वशिला पृथ्वीराज चव्हाण
- कोट
केंद्र सरकारने कृषी कायद्याबरोबरच कामगार कायद्यातही बदल केले आहेत. हे कायदे शेतकऱ्यांबरोबरच कामगारांच्याही जिवावर उठणारे आहेत. त्यामुळे कामगार कायदेही सरकारने मागे घ्यावेत. अन्यथा शेतकऱ्यांबरोबर कामगारही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत.
- अनिल घराळ
कामगार नेते
फोटो : ०६केआरडी०५
कॅप्शन : कऱ्हाडच्या कोल्हापूर नाक्यावर शनिवारी शेतकरी संघटनांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.