पाचगणीमध्ये शिवसेनेकडून रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:44 IST2021-08-25T04:44:27+5:302021-08-25T04:44:27+5:30
पाचगणी : जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर पाचगणीत शिवसैनिक चांगलेच ...

पाचगणीमध्ये शिवसेनेकडून रास्ता रोको
पाचगणी : जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर पाचगणीत शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा, असे निवेदन देण्यात आले.
पाचगणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास राज्य मार्गावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून नारायण राणे यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांकडून नारायण राणे यांचा कोंबडी चोर म्हणून उल्लेख करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवसैनिकांनी झिंदाबाद झिंदाबाद शिवसेना झिंदाबादच्या जोरदार घोषणा दिल्या. आंदोलना दरम्यान रास्ता रोको करण्यात आला होता. यावेळी सेनेचे माजी तालुकाध्यक्ष अजित कासुर्डे यांनी भविष्यात नारायण राणे यांना महाबळेश्वर तालुक्यात फिरकू देणार नाही, असा इशारा निवेदनाद्वारे दिला.
यावेळी नगरसेवक प्रवीण बोधे, संजय राजपुरे, अशोक भिलारे, संदेश कासुर्डे, अजित मालुसरे, विष्णू कासुर्डे उपस्थित होते. पाचगणीचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवला होता.