आंधळे विज्ञान हे फसवे ठरते : सत्यजित रथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:38 IST2021-05-23T04:38:55+5:302021-05-23T04:38:55+5:30
सातारा : कार्यकारणभाव तपासून न घेतलेल्या आंधळ्या विज्ञानाचे रूपांतर छद्म अथवा फसव्या विज्ञानात होते, असे प्रतिपादन शास्त्रज्ञ ...

आंधळे विज्ञान हे फसवे ठरते : सत्यजित रथ
सातारा : कार्यकारणभाव तपासून न घेतलेल्या आंधळ्या विज्ञानाचे रूपांतर छद्म अथवा फसव्या विज्ञानात होते, असे प्रतिपादन शास्त्रज्ञ डॉ. सत्यजित रथ यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे “फसवे विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन" या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
डॉ. रथ म्हणाले, छद्म विज्ञानातील अनेक कल्पना सर्वसामान्य लोकांनी साथीमुळे उद्भवणाऱ्या भीतीपासून आपल्याला काहीतरी संरक्षण मिळावे, आधार मिळावा यासाठी स्वीकारलेल्या दिसतात. कारण त्यात काहीतरी तार्किक वाटणारे समाधान मिळते व या साथीसारख्या भयंकारी काळात अशा स्वरूपाच्या छद्मविज्ञानी कल्पना लोकांच्या पचनी पडू लागतात आणि त्याचा फायदा हितसंबंधी लोक घेतात.
विज्ञानाचे नाव वापरणाऱ्या कोणत्याही गोष्टीबद्दल चटकन अविश्वास दाखवू नका तसेच पटकन विश्वासही ठेवू नका, पुरावा मागा, तपासा, त्यांची शास्त्रीय कसोटीवर पारख करा, असा सल्ला डॉ. सत्यजित रथ यांनी देत श्रोत्यांनी विचारलेल्या प्रतिकार शक्ती, लस, आयुर्वेदिक उपचार या संदर्भातील अनेक प्रश्नांना व्याख्यानानंतर समर्पक उत्तरे दिली.
व्याख्यानाच्या सुरुवातीला फसवे विज्ञान विरोधी जनजागर अभियानाची माहिती आणि डॉ. सत्यजित रथ यांचा परिचय मुक्ता दाभोलकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र लांजेवार यांनी केले. व्याख्यानाला महाराष्ट्रातील विविध भागांतून ५०० च्यावर कार्यकर्ते आणि सर्वसामान्य लोक ऑनलाईन उपस्थित होते. या सर्व उपस्थितांचे आभार राहुल थोरात यांनी मानले.