पाण्याच्या शोधासाठी काळवीट विहिरीत
By Admin | Updated: April 3, 2016 23:50 IST2016-04-03T23:05:24+5:302016-04-03T23:50:26+5:30
घोलपवाडी : ग्रामस्थांकडून सुखरूप सुटका

पाण्याच्या शोधासाठी काळवीट विहिरीत
मसूर : पाटण तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. याचा फटका वन्यप्राण्यांनाही बसायला लागला आहे. पाण्यासाठी जंगली प्राणी जीव धोक्यात घालत असल्याची घटना रविवारी उघडकीस आली. घोलपवाडी येथे पाण्याच्या शोधात एक काळवीट लोकवस्तीत आले; पण दुर्दैवाने ते विहिरीत पडले.
याबाबत माहिती अशी की, घोलपवाडी येथे सुरेश भानुदास घोलप यांची विहीर आहे. शनिवारी मध्यरात्री एक काळवीट पाण्याच्या शोधात विहिरीजवळ आले. विहिरीचा अंदाज न आल्याने ते आत पडले; पण पाणी कमी असल्याने ते जिवंत राहिले. काही ग्रामस्थ रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास शेताकडे निघाले असताना विहिरीतून प्राणी ओरडत असल्याचा आवाज ऐकू आला. त्यामुळे त्याला जिवंत बाहेर काढण्यासाठी लोकांनी पळापळ सुरू केली. वनकर्मचारी बाळकृष्ण जाधव यांना या घटनेची माहिती दिली. ग्रामस्थ भरत चव्हाण यांनी जेसीबी बोलावून त्याला दोर बांधून काहीजण विहिरीत उतरले. काळवीटचे पाय बांधून त्याला अलगद वर काढले. काळवीटला दूर नेऊन त्याच्या पायाची दोरी सोडली असता ते उसाच्या शेताकडे पळून गेले. (वार्ताहर)