ब्लॅक स्पाॅट हटले... जीवघेणे जीव वाचले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:42 IST2021-09-06T04:42:47+5:302021-09-06T04:42:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : महामार्गावर सगळेच अपघात हे वेगामुळे होत नसून, रस्त्यातील तांत्रिक बाबींमुळे अनेक अपघात होत असल्याचे ...

ब्लॅक स्पाॅट हटले... जीवघेणे जीव वाचले!
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : महामार्गावर सगळेच अपघात हे वेगामुळे होत नसून, रस्त्यातील तांत्रिक बाबींमुळे अनेक अपघात होत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे पोलिसांनी असे ५२ ब्लॅक स्पाॅट शोधून त्यातील ९ ब्लॅक स्पाॅट्सवर उपाययोजना केल्याने अपघातातील जीवघेणे जीव वाचले आहेत. याठिकाणी गेल्या सहा महिन्यांत एकदाही अपघात झाला नसल्याचे समोर आले आहे.
महामार्गावरून प्रवास करताना अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. अतिवेग हे प्रमुख कारण असले तरी रस्त्यामधील तांत्रिक बाबीही अपघाताला तितक्याच जबाबदार आहेत. रस्त्यातील तीव्र चढ-उतार, धोकादायक वळण, दिशादर्शक फलकांचा अभाव, रस्त्यातील खड्डे, महामार्गावर येण्यासाठी अनधिकृतपणे खोदलेले मार्ग अपघाताला कारणीभूत ठरत होते. त्यामुळे महामार्ग पोलिसांनी सर्वेक्षण करून जिल्ह्यात एकूण ५२ ब्लॅक स्पाॅट शोधून काढले. याठिकाणी वारंवार अपघात होत होते. हे अपघात होऊ नयेत म्हणून यातील ९ ब्लॅक स्पाॅट्सवर उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांत याठिकाणी एकही अपघात तर झाला नाहीच, शिवाय एकाचाही जीव गेला नाही. आता उर्वरित ३६ ब्लॅक स्पाॅट्सवरही याचप्रकारे उपाययोजना करण्यात येणार असून, तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
चाैकट : ब्लॅकस्पाॅट म्हणजे काय
महामार्गावर ज्याठिकाणी सातत्याने अपघात होत असतात. यापूर्वी अनेकदा त्याचठिकाणी नागरिकांचे जीव गेलेत. त्या ठिकाणांना ब्लॅक स्पाॅट असे संबोधले जाते. महामार्ग पोलीस असे ब्लॅक स्पाॅट शोधून त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत, यावर एक प्रस्ताव तयार करतात. महामार्ग प्राधिकरणला तो अहवाल दिला जातो. त्यानंतर महामार्ग प्राधिकरण ब्लॅक स्पाॅटच्या ठिकाणांची उपाययोजना करतात.
चाैकट : हे आहेत कमी झालेले ब्लॅक स्पाॅट
कवठे, उडतारे, खिंडवाडी चाैक, अतित, खोडद, माहुली, गोकुळ ढाबा, धामणेर रेल्वे गेट, दत्त चाैक ही ठिकाणे ब्लॅक स्पाॅटमधून कमी झाली आहेत. या ठिकाणांच्या आजूबाजूला अपघात झाले आहेत. मात्र, या नऊ ठिकाणी पुन्हा जीवघेणे अपघात झालेले नाहीत.