भाजप ताकदीनिशी मैदानात उतरणार

By Admin | Updated: March 20, 2016 23:51 IST2016-03-20T22:03:44+5:302016-03-20T23:51:52+5:30

जय्यत तयारी : मुख्यमंत्र्याच्या प्रयत्नांतूनच नगरपंचायत अस्तित्वात आल्याच्या भावनेचा लाभ उठविण्याची जोरदार तयारी

The BJP will go on the strength of the strongest | भाजप ताकदीनिशी मैदानात उतरणार

भाजप ताकदीनिशी मैदानात उतरणार

साहिल शहा -- कोरेगाव --भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्यांचा आपला पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेसाठी नवनवीन योजना आणून, त्यांचे जीवन उंचावले आहे. कोरेगावमध्ये नगरपंचायत स्थापन करण्यामध्ये भाजपची भूमिका महत्वाची आहे. मुख्यमंत्र्यांकडेच नगरविकास खाते असल्याने त्यांनी निर्णय घेतल्यानंतर नगरपंचायत अस्तित्वात आली आहे. कोरेगावात भाजप पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीला सामोरे जाणार आहे.
भाजपची कोरेगाव तालुक्यात चांगली ताकद आहे. समाजातील विविध घटक पक्षाशी निगडीत असून, पक्षाच्या माध्यमातून अनेकविध कामे तालुक्यात झालेली आहेत. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार असताना त्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांना प्रखर विरोध पक्षाने केला असून, विविध आंदोलने करत सामान्यांना न्याय देखील मिळवून दिला आहे.
सरकारने जिल्हा आणि तालुकापातळीवर स्थापन केलेल्या विविध समित्यांच्या माध्यमातून सकारात्मक काम करत जनतेच्या अडचणी सोडविल्या आहेत.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजप नेत्या कांताताई नलावडे, महेश शिंंदे यांनी कोरेगाव तालुक्याला अपेक्षित असे सहकार्य केले आहे.
जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर यांनी संघटन कौशल्याच्या माध्यमातून अनेकांना पक्षात सामावून घेण्यासाठी प्रक्रिया सुरु केली आहे. मंत्री बापट यांनी कोरेगाव शहर आणि तालुक्याला विशेष सहकार्य केले आहे. कोरेगावात त्यांचे संपर्क कार्यालयदेखील सुरु करण्यात आले आहे.
त्यांच्या दौऱ्यांमुळे पक्षसंघटनेत नवसंजीवनी मिळत आहे. कोरेगाव शहरात ग्रामपंचायत असल्याने येणाऱ्या अडचणींनी पक्ष पातळीवर अनेकदा चर्चा झाल्या होत्या. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायती विषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कोल्हापूर येथील पक्षाच्या अधिवेशनादरम्यान चर्चा केली होती.
त्यांना नगरपंचायत कशी योग्य आहे, हे पटवून देण्यात आले होते. मुंबईत परतल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिल्यानंतर संथ गतीने वाटचाल असलेल्या नगरपंचायतीची फाईल गतीने विविध विभागांमधून फिरली आणि अखेरीस मुख्यमंत्र्यांनी ती मंजूर केली आणि दि. ५ मार्च रोजी नगरपंचायत अस्तित्वात आली. संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजनेचे काम गतीने होण्यासाठी भाजपने प्रशासनाला केलेल्या मागणीप्रमाणे आणि सहकार्याप्रमाणे आता डिजिटल इंडियाच्या धर्तीवर एका क्लिकवर पेन्शन लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागली आहे. गतिमान कामकाजाबरोबरच सरकारचे दरमहा लाखो रुपयांची बचत या प्रक्रियेमुळे झाली असून, जिल्ह्यात आता पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविला जाणार
आहे.

कोरेगावचा
रणसंग्राम


राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आजवर कोरेगाव शहराच्या जीवावर सत्ता उपभोगली, मात्र त्यांनी जनतेसाठी काडीचे काम केले नाही. सत्ता आणि स्वार्थासाठी त्यांनी नगरपंचायतीला खोडा घालण्याचे काम केले, मात्र भाजप सरकारने नगरपंचायत स्थापन केलीच. कोरेगावकरांना आम्ही पक्षाच्या माध्यमातून न्याय मिळवून देणार आहे. भाजपच लोकांचा विकास करु शकते, हेच कोरेगावात आम्ही दाखवून देऊ.
- बबनराव कांबळे,
जिल्हा उपाध्यक्ष, भाजप.


भाजपच्या माध्यमातून जिल्ह्यात लोणंद आणि कोरेगावात नगरपंचायतीची स्थापना झालेली आहे. भाजप हा लोकांचा पक्ष आहे, त्याला लोकांच्या अडचणी माहिती आहेत. कोरेगावातील समस्या सोडवायच्या असतील, तर भाजपशिवाय पर्याय नाही. आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जनतेसमोर जाणार आहोत. अनेकजण सध्या पक्षाच्या संपर्कात असून, त्यांना बरोबर घेत पूर्ण ताकदीनिशी पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढविणार आहोत.
- विक्रम पावस्कर, जिल्हाध्यक्ष, भाजप.


भाजपने विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. सामान्यांचा विकास हा केवळ भाजपच करु शकतो, हे केंद्रातील आणि राज्यातील सरकारने अल्प कालावधीत दाखवून दिले आहे. केंद्र सरकारच्या मदतीने आणि मिळालेला नगरपंचायतीचा दर्जा याची सांगड घालत शहरातील प्रलंबित असलेली गटार योजना, नदी सुधार योजना, सांडपाणी निर्मुलन योजना, पाण्याच्या रिझर्व्ह साठ्यासाठी वसना-वांगणा नदीवर बंधारे टाकले जाणार आहेत. तीळगंगा नदीवरील साखळी पुलाचा कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यात रुपांतर करुन महिलांना कपडे धुणे, जनावरांना पाणी पिण्यासाठी या पाण्याचा वापर केला जाईल. भाजी मंडईचा प्रश्न मार्गी लावणार असून, बाजार मैदानाचा आठवडा बाजार आणि मंडईत रुपांतर केले जाईल.
- सोपानराव गवळी-भोसले, तालुकाध्यक्ष, भाजप.



भाजपने गेल्या दोन वर्षांमध्ये देशात आणि राज्यात केलेले काम जनतेसमोर आहे. सामान्यांसाठी अत्यंत महत्वाचे विषय पक्षाने मार्गी लावले आहेत. कोरेगावसाठी अत्यंत महत्वाचा सातारा-पंढरपूर राज्यमार्ग आता राष्ट्रीय महामार्ग म्हणून भाजपने जाहीर केला आहे. या महामार्गामुळे कोरेगावचा जलदगतीने विकास होणार आहे. भाजप येत्या तीन वर्षात कोरेगावचा कायापालट करेल, यात तीळमात्र शंका नाही. आम्ही जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहे.
- छगनलाल ओसवाल, शहराध्यक्ष भाजप.

Web Title: The BJP will go on the strength of the strongest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.