भाजप पदाधिकाऱ्यांनी हातात घेतला झाडू...
By Admin | Updated: November 14, 2014 23:17 IST2014-11-14T22:32:36+5:302014-11-14T23:17:08+5:30
बसेस अडविल्या : स्वच्छतेची ग्वाही दिल्यानंतरच वाहतूक सुरू

भाजप पदाधिकाऱ्यांनी हातात घेतला झाडू...
सातारा : भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी बसस्थानक आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्याची मागणी करत एसटी बसेस अडवून धरल्या. एका बाजूला एसटी बसेस रोखून धरल्या असतानाच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हाती झाडू घेत परिसराची स्वच्छता केली. दरम्यान, यावेळी एसटी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिसर स्वच्छतेची ग्वाही दिल्यानंतर एसटी बसेस सोडून देण्यात आल्या.
सातारा बसस्थानक आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा असून, येथे दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे. बसस्थानकाशेजारून प्रशासकीय इमारतीकडे जाणाऱ्या मार्गावरून जाताना तोंडावर रुमाल ठेवूनच जावे लागते. त्यातचे बसस्थानकातून बाहेर पडणारे एक चेंबर येथेच उघडे असल्यामुळे दुर्गंधी अधिक असते. यामुळे ‘स्वच्छ भारत’ अभियान योजनेअंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेत माजी आ. दिलीप येळगावकर, नगरसेविका सुवर्णा पाटील, सुहास पोरे, जयदीप ठुसे, सुजाता कोल्हटकर, निर्मला सांगलीकर, मंजू राजेशिर्के, पृथ्वीराज पाटील, आप्पा कोरे आदी सहभागी झाले होते.
दरम्यान, अस्वच्छतेला एसटी प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप करत पदाधिकाऱ्यांनी कऱ्हाड, सोलापूरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या. यामुळे काहीवेळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. एसटी बसेस बराच वेळ थांबून राहिल्यामुळे येथे बांधकाम विभागाचे अभियंता आणि एसटीचे अधिकारी आले. त्यांनी येथील स्वच्छतेचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. (प्रतिनिधी)