भाजपने केले सातार्यावर लक्ष केंद्रित
By Admin | Updated: May 21, 2014 17:36 IST2014-05-21T01:04:35+5:302014-05-21T17:36:09+5:30
संपर्क कार्यालयाचे उद््घाटन : मस्करवाडीच्या सरपंचांचा सहकार्यांसह पक्षप्रवेश

भाजपने केले सातार्यावर लक्ष केंद्रित
सातारा : नरेंद्र मोदींच्या लाटेवर स्वार होऊन सातार्यातही पक्षाचे बळ वाढविण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पक्षाचे जिल्हा सरचिटणीस दत्ताजी थोरात यांच्या संपर्क कार्यालयाचे नुकतेच उद््घाटन करण्यात आले. याच कार्यक्रमात मस्करवाडीच्या सरपंचांनी कार्यकर्त्यांसमवेत पक्षात प्रवेश केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मिळालेल्या कालावधीचा पक्षसंघटना बळकट करण्यासाठी वापर करून घेण्याचा प्रयत्न भाजपकडून ठिकठिकाणी होणे अपेक्षितच होते. सध्याच्या अनुकूल कालावधीतच भाजपचे जिल्हा सरचिटणीस दत्ताजी थोरात यांच्या संपर्क कार्यालयाचे उद््घाटन पक्षाचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडजारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील आणि जिल्हाध्यक्ष भरत पाटील उपस्थित होते. याच कार्यक्रमात मस्करवाडीचे सरपंच अभय पवार आणि त्यांचे सहकारी सुरेश माने, मच्छिंद्र पवार, सर्जेराव लिपाणे, लहुराज माने, शंकर पवार, सुहास माने, विलास माने, रमेश माने आदी कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ‘दत्ताजी थोरात हे माझे जवळचे मित्र असून, मागील २५ वर्षांपासून ते एकनिष्ठपणे, विचारांशी स्थिर राहून काम करीत आहेत. एक चांगली, निकोप व निर्भय राजकीय संस्कृती निर्माण करून पक्षसंघटना बळकट करण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे,’ असे अभय पवार यांनी सांगितले. पवार यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर करण्यात आले. जिल्हा सचिव सुहास पोरे यांनी स्वागत केले. सुहास गानू यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास प्रदेश कार्यकारिणी सदस्य किशोर गोडबोले, गोविंद लेले, ज्येष्ठ करसल्लागार सी. व्ही. दोशी, महेश शिवदे, विठ्ठल बलशेटवार, धनंजय थोरात उपस्थित होते. (प्रतिनिधी)