सात लाखांच्या जप्तीप्रकरणी भाजप उच्च न्यायालयात जाणार !
By Admin | Updated: October 16, 2014 00:09 IST2014-10-15T23:11:09+5:302014-10-16T00:09:52+5:30
‘कऱ्हाड दक्षिण’चा संदर्भ : पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन

सात लाखांच्या जप्तीप्रकरणी भाजप उच्च न्यायालयात जाणार !
सातारा : जिल्हा पोलीस प्रशासनाला हाताशी धरून कऱ्हाड दक्षिणमधील राजकीय विरोधक भाजपला बदनाम करत असल्याची तक्रार भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. भरत पाटील यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल आणि पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे केली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी राजकीय हेतूने एका राजकीय पक्षाला मदत होईल, असे कृत्य केले आहे. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही अॅड. पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राजकीय विरोधकांनी जिल्हा प्रशासनाला हाताशी धरून कऱ्हाड येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा रद्द करण्यास भाग पाडले. दहा-बारा दिवस रात्री-अपरात्री पोलीस कर्मचारी भरत पाटील यांच्या घराच्या आजूबाजूला फिरत असून, गेले काही दिवस त्यांचा फोन टॅप करण्याबरोबरच गाडीचा पाठलागही केला जात आहे. भरत पाटील यांनी दि. १३ आॅक्टोबर रोजी भाजपच्या खात्यातून सात लाख रुपये रक्कम धनादेशाद्वारे काढली होती. ही रक्कम भाजप प्रदेश कार्यालयाने निवडणूक खर्चाकरिता पाठविली होती. महाराष्ट्र बँकेतून ही रक्कम काढून घेत असतानाच पोलिसांनी राजकीय द्वेषापोटी खाली थांबून रक्कम ताब्यात घेतली. पोवई नाका येथे रक्कम ताब्यात घेतल्यानंतर त्याबाबत स्पष्टीकरणही देण्यात आले. त्याची कागदपत्रेही दाखविली. मात्र, पोलिसांनी ऐकले नाही. या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना नेमून दिलेला प्रतिनिधी उपस्थित नव्हता. ही कारवाई कऱ्हाड दक्षिणमधील राजकीय विरोधकांनी विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन केली आहे. पोलिसांचे हे कृत्य आदर्श आचारसंहिता भंग करणारे आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. यासंदर्भात भाजप लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)