‘लेटकमर’ कर्मचाऱ्यांना ‘बायोमेट्रिक’चा डोस!
By Admin | Updated: May 23, 2016 00:20 IST2016-05-22T21:22:18+5:302016-05-23T00:20:10+5:30
कऱ्हाड पालिकेचा निर्णय : ३७४ कर्मचारी मशीनवर; पालिकेत पाच ठिकाणी कार्यान्वित

‘लेटकमर’ कर्मचाऱ्यांना ‘बायोमेट्रिक’चा डोस!
कऱ्हाड : पालिकेतील कर्मचाऱ्यांनी वेळेवर काम करावे तसेच त्यांच्या नियमित उपस्थितीबाबत माहिती व्हावी, म्हणून पालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांसाठी आता बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आली आहे. पालिकेतील ३७४ कर्मचारी बायोमेट्रिक मशीनवर आल्याने त्यांच्याकडून वेळेचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी घेतलेल्या निर्णयामुळे पालिकेतील ‘कामचुकार’ व लेटकमर्सनी चांगलीच धास्ती घेतली आहे.येथील पालिकेत नव्याने रुजू झालेल्या मुख्याधिकारी औंधकर यांनी एक फेब्रुवारीपासून कार्यालयीन कामकाजाच्या वेळेपूर्वी नऊ वाजून ५५ मिनिटांनी राष्ट्रगीत सुरू करण्याची सूचना करत लेटकमर्सना गुलाबपुष्प देण्याचा उपक्रम सुरू केला. तसेच गांधीगिरी मार्गाचा अवलंब करत अनेक उपक्रम सुरू केले. पालिकेत उशीर येणाऱ्या व कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिस्तीची सवय लागावी. या मुख्य उद्देशाने मुख्याधिकारी औंधकर यांनी पालिकेतील सुमारे ३७४ कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रिक मशीन बसविण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पालिकेत पाच ठिकाणी बायोमॅट्रिक मशीन बसविण्यात आलेल्या आहेत.
पालिकेची चोवीस तास योजना, विद्युत विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग तसेच जलशुद्धीकरण केंद्र अशा अनेक विभागांत सुमारे ३७४ कर्मचारी काम करतात. त्यांच्या कामाच्या वेळाही वेगवेगळ्या असल्याने त्यांच्या कामाची नोंद पालिकेत करणे गरजेचे असते. मात्र, चुकीच्या नोंदीमुळे काहींचा पगारही रखडण्याच्या समस्या उद्भवलेल्या आहेत.
पालिकेत काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यालयीन कामाकाजाची वेळ ही सकाळी दहा ते सायंकाळी सहा अशी आहे. तर शहरातील स्वच्छतेचे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची वेळ ही पहाटे पाच ते सकाळी नऊ आणि दुपारी दोन ते सायंकाळी सहा अशी आहे. त्या व्यतिरिक्त इतर तीन शिफ्टमध्ये काम करणारेही कर्मचारी आहेत. अशांची कामांची दैनंदिन नोंद ही होणे गरजेचे आहे. हे ओळखून पालिकेत पाच ठिकाणी बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आलेले आहेत.
बायोमॅट्रिक मशीनमुळे पालिकेतील सर्व कर्मचारी, विभागातील अधिकारी यांची कामावर हजर राहण्याच्या वेळेची नोंद होणार आहे. बायोमेट्रिक मशीनवरील नोंदीनुसार कर्मचाऱ्यांचे पगारही आता आॅनलाईन पद्धतीने जमा होण्यास मदत झाल्याने कर्मचाऱ्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)
कऱ्हाड पालिकेत सुमारे ३७४ कर्मचारी काम करत आहेत. त्यांच्या कामांची नोंद होणे आवश्यक आहे. नव्याने बायोमेट्रिक मशीन आल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हे चांगले फायद्याचे ठरत आहेत. या मशीनवरील कामाच्या वेळेच्या नोंदीनुसार कर्मचाऱ्यांचे पगार केले जात आहेत. आॅनलाईनपद्धतीने पगार केले जात आहे. त्याचा कर्मचाऱ्यांना चांगला फायदा होत आहे.
- विनायक औंधकर,
मुख्याधिकारी, कऱ्हाड पालिका
लेटकमर्सनी घेतली धास्ती...
पालिकेत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची अधिकाऱ्यांशी अनेकवेळा भेटही होत नाही. कामाच्या वेळी अधिकारी आपल्या संबंधित विभागात उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून केल्या जात असल्याने याचा विचार करत मुख्याधिकारी औंधकर यांनी पालिकेत बायोमेट्रिक मशीन बसविण्याचा निर्णय घेतला. पालिकेत बसविण्यात आलेल्या मशीनमुळे लेटकमर्सनी चांगलीच याची धास्ती घेतली आहे.