जिल्ह्यातील बर्ड फ्लू नियंत्रणात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:09 IST2021-02-05T09:09:42+5:302021-02-05T09:09:42+5:30
सातारा : जिल्ह्यातील मरिआईचीवाडीवगळता इतर सर्व ठिकाणच्या मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, तर चार दिवसांत कोठेही मृत कोंबड्यांची ...

जिल्ह्यातील बर्ड फ्लू नियंत्रणात !
सातारा : जिल्ह्यातील मरिआईचीवाडीवगळता इतर सर्व ठिकाणच्या मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, तर चार दिवसांत कोठेही मृत कोंबड्यांची नोंद झाली नसल्याने जिल्ह्यातील बर्ड फ्लू नियंत्रणात आला आहे. त्याचबरोबर मरिआईचीवाडीतील बाधित क्षेत्र परिसरात पशुसंवर्धन विभागाकडून सर्वेक्षण सुरूच आहे.
बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आतापर्यंत माण तालुक्यातील दोन गावांत, तर खंडाळा आणि कऱ्हाड तालुक्यातील प्रत्येकी एका गावांत मृत कोंबड्या आढळून आल्या होत्या. यामधील खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडीमधील कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूने झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले होते. कऱ्हाड तालुक्यातील हणबरवाडी आणि माणमधील हिंगणी व बिदालमधील मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता.
खटाव तालुक्यातील कटगुणमध्येही काही कोंबड्या मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले होते तसेच त्यांच्या अंगावर व्रणही होते. त्यामुळे मुंगसाच्या हल्ल्यात या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. येथील मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लूचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. तसेच कुडाळमधील मृत कोंबड्यांचाही अहवाल निगेटिव्ह आला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील शिरवळ, भिलार, मलवडी आणि तडवळेमधील मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून या अहवालांची प्रतीक्षा आहे.
चौकट :
तीन महिने सर्वेक्षण सुरू राहणार...
जिल्ह्यातील मरिआईचीवाडीवगळता इतर तालुक्यांतील मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लू अहवाल निगेटिव्ह आल्याने पोल्ट्रीधारकांतील भीतीचे वातावरण कमी झालेले आहे. असे असलेतरी मरिआईचीवाडी येथे बर्ड फ्लूने कोंबड्या मृत्युमुखी पडल्या होत्या. तेथील तीन किलोमीटर परिसरात पशुसंवर्धन विभागाकडून सर्वेक्षण सुरूच आहे. दर १५ दिवसांनी अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. तीन महिने सर्वेक्षण करण्यात येणार आहे.