साताऱ्यात साकारणार जैवविविधता उद्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:08 IST2021-02-05T09:08:31+5:302021-02-05T09:08:31+5:30

सातारा : पुणे-बंगळुरू महामार्गालगत असलेल्या पोलीस दलाच्या तीस एकर जागेवर सह्याद्री देवराई, पोलीस प्रशासन व क्रेडाईच्या संयुक्त विद्यमाने जैवविविधता ...

Biodiversity park to be set up in Satara | साताऱ्यात साकारणार जैवविविधता उद्यान

साताऱ्यात साकारणार जैवविविधता उद्यान

सातारा : पुणे-बंगळुरू महामार्गालगत असलेल्या पोलीस दलाच्या तीस एकर जागेवर सह्याद्री देवराई, पोलीस प्रशासन व क्रेडाईच्या संयुक्त विद्यमाने जैवविविधता उद्यान उभे राहत आहे. हे उद्यान राज्यासाठीच नव्हे तर देशासाठी पथदर्शी ठरेल, असा विश्वास सह्याद्री देवराई संस्थेचे प्रणेते तथा अभिनेते सयाची शिंदे यांनी व्यक्त केला.

साताऱ्यातील शासकीय विश्रामगृह येथे सोमवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सह्याद्री देवराईचे विजयकुमार निंबाळकर, मधुकर फल्ले, क्रेडाईचे अध्यक्ष जयंत ठक्कर, सागर साळुंखे, कमलेश पिसाळ आदी उपस्थित होते.

सयाजी शिंदे म्हणाले, वृक्षलागवड व संवर्धन मोहिमेत अग्रेसर असलेल्या ‘देवराई’च्या वतीने दरवर्षी फेव्रुवारी महिन्यात वृक्ष संमेलनाचे आयोजन केले जाते. यंदा कोरोनामुळे हे संमेलन ऑक्टोबर महिन्यात होईल. वृक्षचळवळ मोहीम बळकट व्हावी, यामध्ये तरुणांचा, महाविद्यालयांचा सहभाग वाढवा यासाठी प्रथमच ‘निसर्गराजा’ व ‘निसर्गराणी’ पुरस्कार देण्याचे देवराईचे नियोजन आहे. संबंधितांनी किती व कोणती झाडे लावली, किती झाडे जगविली याची पाहणी करून प्रत्येकी दहा-दहा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जाईल. महाविद्यालयात ज्या पद्धतीने क्रीडा स्पर्धा भरतात, त्याच धर्तीवर वृक्षलागवड स्पर्धेचे आयोजन केले जाईल.

हे करत असतानाच पुणे-बंगळुरू महामार्गालगत जैवविविधता उद्यान साकारण्याचा देवराईचा मनोदय आहे. या उद्यानासाठी पोलीस दलाने गोळीबार मैदानाची तीस एकर जागा देऊ केली आहे. या जागेवर देशातील सर्व भारतीय वृक्षांची लागवड केली जाईल. सुवासिक वनस्पती, गवताच्या प्रजाती, राज्य वृक्ष व राज्य फूल, दुर्मिळ व नष्ट होत चाललेल्या वनस्पती आदींची लागवड करून शेततळी, पाझर तलावाची निर्मितीही केली जाणार आहे. या कामास प्रारंभ झाला असून, यासाठी पोलीस दल व क्रेडाई संस्थेचे मोठे सहकार्य मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही काटेसावर महोत्सव साजरा केला जाणार असून, यावेळी तो कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथे होणार असल्याचे सयाजी शिंदे यांनी सांगितले.

(चौकट)

गड किल्ल्यावर एकतरी झाड लावा

दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१वी जयंती साजरी केली जाणार आहे. जयंतीदिनी हजारो मावळे गड-किल्ल्यांना भेटी देऊन मशाल पेटवितात. यंदा या मावळ्यांनी शिवरायांच्या स्मृती जतन करतानाच गडकिल्ल्यांवर ३९१ झाडे लावून पर्यावरणाचे संवर्धन करावे, असे आवाहन यावेळी सयाजी शिंदे यांनी केले.

Web Title: Biodiversity park to be set up in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.