बाबासाहेब आंबेडकर या नावामध्ये मोठी ताकद

By Admin | Updated: May 24, 2016 00:53 IST2016-05-23T21:47:24+5:302016-05-24T00:53:26+5:30

अजित आपटे : सायगाव येथे फुले-शाहू-आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव

Big strength in the name of Babasaheb Ambedkar | बाबासाहेब आंबेडकर या नावामध्ये मोठी ताकद

बाबासाहेब आंबेडकर या नावामध्ये मोठी ताकद

सातारा : ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्याविभूषित होऊन विविध क्षेत्रांत आपल्या ज्ञानाचा ठसा उमटविला आहे. आपण गरिबीमध्ये जन्म घेतला असला तरी ज्ञानाच्या श्रीमंतीमुळे जागतिक पातळीवर ते पोहोचले आहेत. डॉ. आंबेडकर या नावामध्ये खूप मोठी ताकद आहे,’ असे प्रतिपादन सायगावचे सरपंच अजित आपटे यांनी केले.
जावळी तालुक्यातील सायगाव येथे बौद्ध विकास सेवा संघ, सिद्धार्थ तरुण मंडळ, आदर्श महिला मंडळ यांच्या वतीने गौतम बुद्ध, छत्रपती शिवराय, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी सभापती वसंतराव मानकुमरे, सुहास गिरी, अजित जगताप, माजी सरपंच अशोक कदम व मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्रेमानंद जगताप होते.
‘सध्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाचा प्रसार झपाट्याने झालेला आहे. याचा वापर ज्ञान वाढण्यासाठी करणे गरजेचे असताना काहीजण त्याकडे मनोरंजनाच्या दृष्टीने पाहत आहेत. ग्रामीण भागातील युवापिढीने स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी डॉ. आंबडेकर यांच्यासारखे ज्ञानाचे कण वेचले पाहिजेत. लहानपणी डॉ. आंबेडकर यांचे नाव भीमराव असे ठेवले होते. या भीमरावने ‘भीमक्रांती’ करून सर्वांना भारतीय राज्यघटना दिली. जागतिक पातळीवर त्यांनी शोधनिबंध लिहिले. त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या विचारांचा प्रसार गतिमानतेने केला आहे. बौद्ध विकास सेवा संघ, सायगाव यांची एकजूट मी लहानपणापासून पाहत आहे. माझे आजोबा अप्पासाहेब आपटे यांनी आम्हाला ‘जात-पात तोडो’चे संस्कार दिले आहेत. ही आमची शिदोरी कायम टिकणार आहे. तसेच गावाच्या विकासासाठी संपूर्ण सहकार्याची भावना आमच्या मनात आहे,’ असे आपटे यांनी स्पष्ट केले.
यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक बळवंत जगताप यांना जीवन गौरव व अ‍ॅड. शशिकला जगताप, डॉ. सुप्रिया जगताप, अंकिता जगताप, अभियंता अमित जगताप, भक्ती कांबळे यांनी विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल त्यांच्या मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
प्रारंभी बुद्धवंदना व युगपुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन व भव्य मिरवणुकीचा कार्यक्रम जयघोषात पार पडला.
या कार्यक्रमासाठी शाम जगताप, राजरत्न जगताप, जयवंत जगताप, अनिल जगताप, अशोक जगताप, निनाद जगताप, अशोक कांबळे, बाळू जगताप, बाबू जगताप, कल्पना जगताप, लता जगताप, सुमन सावंत, छाया जगताप यांनी परिश्रम घेतले. मिलिंद जगताप व हंबीरराव जगताप यांनी सूत्रसंचालन केले. भारत जगताप यांनी आभार मानले.(वार्ताहर)

सायगाव येथे आयोजित कार्यक्रमात अजित आपटे व इतर.

Web Title: Big strength in the name of Babasaheb Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.