दहिवडी : माण तालुक्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मार्डी, वावरहिरे, बिदाल, आंधळी या गावांना बुधवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी भेट दिली. वावरहिरे व बिदाल या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांचे शंभर टक्के विलगीकरण केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. दरम्यान, तिसऱ्या लाटेसाठी सर्वांनी आतापासून सज्ज रहावे, गाव कोरोनामुक्त झाले म्हणून गप्प बसू नका टेस्ट सुरू ठेवा अशा सूचनाही त्यांनी केल्या.
बिदालमधील विलगीकरणाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमिक विद्यालय, पुनर्वसन शाळेत स्वत: जाऊन लोकांना कोण कोणत्या सुविधा मिळतात याची चौकशी केली. बिदाल गावाने ४ लाख रुपये लोकवर्गणी गोळा केली. विलगीकरणाच्या ठिकाणी चहा, नाश्ता, अंडी, दोन वेळचे जेवण, गरम पाणी, स्वच्छतागृह अशा सर्व सुविधा पुरविण्यात आल्या. अशी माहिती सरपंच बापूराव जगदाळे व पोलीस पाटील लखन बोराटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
बिदाल गावातील आशा सेविकांनी सर्व्हे करुन जवळपास एक हजार नागरिकांच्या चाचण्या केल्या आहेत. याबद्दलही जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले. लोकवगार्णीतून गावाला गोळ्या, औषधे, बेड व इतर साहित्य उपलब्ध करुन दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. बिदाल येथील एक आशा व तिचे कुटुंब कोरोना बाधित आहे. त्यांना मदत मिळावी अशी मागणी केली असता जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर यांना तातडीने मदतीच्या सूचना केल्या.
यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश देशमुख, तहसीलदार बाई माने, दहिवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, मलवडी उपकेंद्राचे डॉ. मनोज कुंभार, बिदाल केंद्राच्या डॉ. आश्विनी लोखंडे, प्रताप भोसले, सरपंच बापूराव जगदाळे, उपसरपंच शरद कुलाळ, सोमनाथ भोसले उपस्थित होते.
फोटो : ०२ बिदाल
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बुधवारी बिदाल येथील विलगीकरण कक्षाची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. (छाया : नवनाथ जगदाळे)