भोसले प्रचारात; मोहिते जुळवाजुळवीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:30 IST2021-06-04T04:30:16+5:302021-06-04T04:30:16+5:30
प्रमोद सुकरे कऱ्हाड : सातारा व सांगली जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीची धांदल सध्या ...

भोसले प्रचारात; मोहिते जुळवाजुळवीत!
प्रमोद सुकरे
कऱ्हाड : सातारा व सांगली जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीची धांदल सध्या सुरू आहे. सत्ताधारी सहकार पॅनेलचे नेते डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले सुरुवातीपासूनच प्रचारात सक्रिय दिसत आहेत. याउलट विरोधी पॅनलचे प्रमुख डाॅ. इंद्रजित मोहिते व संस्थापक पॅनलचे नेते अविनाश मोहिते हे अजूनही मनोमिलनाच्या जुळवाजुळवीत दिसत आहेत. त्यामुळे २९ जून रोजी होणारी ही निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी याबाबत सभासदांच्या उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.
कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २४ मे ला जाहीर झाली. २५ मे ते एक जून या कालावधीत अर्ज भरले गेले. २ जूनला छाननीचे सोपस्कार पूर्ण झाले. आता १७ जूनपर्यंत अर्ज माघारीला मुदत आहे. त्यामुळे रिंगणात कोण कोण उरणार आणि कोण कोण माघार घेणार? याबाबतची उत्सुकता लागून आहे.
कारखान्याच्या निवडणुकीची चर्चा होताना गत काही महिन्यांपासून विरोधी मोहितेंच्या मनोमिलनाची चर्चा समोर येत होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी असणारे अविनाश मोहिते व काँग्रेस विचाराला मानणारे डॉ. इंद्रजित मोहिते या दोघांच्यात वरिष्ठ पातळीवरून मनोमीलन होणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत होत्या.
गत दोन महिन्यांत या चर्चा खऱ्या होऊ लागल्या. डॉ. इंद्रजित मोहिते, अविनाश मोहिते यांच्या मनोमिलनासाठी बैठका सुरू झाल्या. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्य सहकारमंत्री विश्वजित कदम, अॅड. उदयसिंह पाटील यांच्यासह काही प्रमुख कार्यकर्त्यांनी यात पुढाकार घेतल्याचे समोर आले आहे.
मनोमिलनाच्या या चर्चा सुरू असतानाच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. चर्चेचे गुऱ्हाळ संपत नसल्याने रयत व संस्थापक पॅनेलने स्वतंत्रपणे अर्ज दाखलही केले आहेत. नुकत्याच झालेल्या छाननीत दोन्ही माजी अध्यक्ष मोहिते यांच्या १२ उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. या सर्व बाबी सत्ताधारी भोसले गटाच्या पथ्यावर पडल्याच्या चर्चा आहेत.
कोरोना संकटामुळे प्रचाराला मर्यादा असल्या तरी भोसले गट प्रचारात सक्रिय दिसत आहे.
याउलट डॉ. इंद्रजित मोहिते, अविनाश मोहिते हे दोन्ही गट अजूनही मनोमिलनाच्या जुळवाजुळवीत दिसत आहेत. मुंबई, कोल्हापूर, कराड येथे झालेल्या बैठकीत अंतिम निष्कर्ष समोर आलेला दिसत नाही. अजूनही बैठका सुरूच आहेत. त्यामुळे माजी अध्यक्ष मोहितेंची आघाडी होणार की बिघाडी कायम राहणार हे सांगणे सध्या अवघड होऊन बसले आहे.
चौकट
सोमवारपर्यंत निर्णय शक्य
डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते या दोन नेत्यांच्यातील मनोमिलनाच्या चर्चा सकारात्मक आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ,सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम हे दोघे यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे एकत्रीकरण व्हायला अडचण नाही. सोमवारपर्यंत याबाबतचा निर्णय समोर येईल, असे मत या मनोमिलन प्रकियेत सहभागी असणाऱ्या एकाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर व्यक्त केले आहे.