फ्लेक्सवरील ‘भोसले’, कुठेच नाही दिसले!

By Admin | Updated: July 29, 2014 23:06 IST2014-07-29T20:45:24+5:302014-07-29T23:06:37+5:30

मुख्यमंत्र्यांचा कऱ्हाड दौरा : अतुल बाबांच्या अनुपस्थितीची ‘हॅटट्रिक’

'Bhosale' on the flakes, can not be seen anywhere! | फ्लेक्सवरील ‘भोसले’, कुठेच नाही दिसले!

फ्लेक्सवरील ‘भोसले’, कुठेच नाही दिसले!

प्रमोद सुकरे - कऱ्हाड , दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रम पत्रिकेवरून कृष्णा उद्योग समूहातील भोसलेंची नावे गायब झाली होती़ राजकीय ताणाताणीनंतर लगेच त्याला मलमपट्टी करण्याचा प्रयत्न झाला़ उंडाळकरांच्या बालेकिल्ल्यात होणाऱ्या बाबांच्या दरबाराच्या फ्लेक्सवर अचानक भोसलेंचा फोटो झळकला खरा; पण फ्लेक्सवरील भोसले चव्हाणांच्या रविवारच्या दौऱ्यात दिवसभर कुठेच न दिसल्याने दक्षिणेतील राजकीय धुसफूस पुन्हा समोर आली आहे़
कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला! यशवंतराव मोहिते आणि विलासराव पाटील-उंडाळकर हे दोनच आमदार या मतदार संघाला माहीत. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर या मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलू लागली़  अतुल भोसलेंनी राष्ट्रवादीला रामराम करीत काँग्रेस प्रवेश केला़ त्यामुळे भोसलेच दक्षिणेतून विधानसभेला काँग्रेसचे उमेदवार असणार, अशी अटकळ बांधली जात होती अन् त्यांनी दक्षिणेवरील स्वारीची तयारीही चालवलीय़
राज्याच्या विधानसभा निवडणुका आपल्याच नेतृत्वाखाली होणार, याची खात्री पटल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दक्षिणेतून लढण्याचे संकेत दिले खरे; पण त्यामुळे प्रत्येक दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या गाडीत असणारे अतुल भोसले गाडीतून खाली कधी उतरले अन् मदनदादा गाडीत कधी बसले, हे कोणालाच समजले नाही.
दक्षिणेतून लढण्याची तयारीच म्हणून मुख्यमंत्र्यांचे सध्या कऱ्हाड दौरे वाढले आहेत़; पण गत तीन दौऱ्यांकडे अतुल भोसलेंनी पाठ फिरवल्याने अनेक चर्चा सुरू झाल्या़ भोसले प्रचाराचाच एक भाग म्हणून मुंबईतही घुसले.
तेथे त्यांनी कऱ्हाड दक्षिणेतील मतदारांचा मेळावा घेतला़ तर मुख्यमंत्र्यांचे कऱ्हाड हेलपाटे वाढले. मुख्यमंत्री चव्हाणांनी सलग तीन रविवारी दक्षिणेत कार्यक्रमांची हॅटट्रिक साधली तशी भोसलेंनी अनुपस्थितीची! त्यामुळे ‘हॉट’ ठरलेल्या कऱ्हाड दक्षिणेत काय शिजतंय, याबाबत सर्वांना उत्सुकता आहे़
सवादेतील कार्यक्रम म्हणजे काकांच्या बालेकिल्ल्यातील बाबांचा दरबार. त्यामुळे या कार्यक्रमाकडे साऱ्यांचेच लक्ष होते़
कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाची जय्यत तयारी केली होतीच; पण विभागात लावण्यात आलेल्या फ्लेक्स बोर्डावर ेमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या बरोबरीने आमदार आनंदराव पाटील, मदनराव मोहिते, डॉ़ सुरेश भोसले, डॉ़ इंद्रजित मोहिते आदींच्या छबी झळकत होत्या़त्यामुळे कृष्णा उद्योग समूहातील मोठे बाबा सबुरीने घेतील, असं समजून आता सारं मिटलंय, असं कार्यकर्त्यांना वाटत होतं; पण भोसलेंच्या अनुपस्थितीने त्यांच्या अपेक्षा हवेतच विरल्याचे पाहायला मिळत आहे.

मदनदादा म्हणतात, ‘सगळं ठीक होईल’
विधानसभेच्या दक्षिणेतील स्वारीची तयारी करणारे अतुल भोसले सध्या स्वकीयांवरच नाराज आहेत म्हणे! मात्र, अतुल भोसलेंचा नामोल्लेख न करता ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, यांनी सवादेत मुख्यमंत्र्यांच्या समोर ‘आमच्यात मतभेद नाहीत़, असले तर दूर होतील सगळं ठिक होईल, तुम्ही काळजी करू नका,’ असं म्हणत उलट-सुलट चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न के लाय.

उंडाळकरांंचे बारीक लक्ष
-विरोधकांच्यात सुरू असणाऱ्या धुसफुशीवर आमदार विलसराव पाटील-उंडाळकरांचे बारीक लक्ष आहे़ आजवर प्रत्येक निवडणुकीत विरोधकांमधील कोणीतरी त्यांच्या गळाला लागल्याचा इतिहास आहे़ ‘यंदा आपल्या गळाला कोण लागेल,’ याचा अंदाज ते बांधत असावेत़
-शेती उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्रमाला महाआघाडीचे सदस्य नेते म्हणून डॉ. सुरेश भोसले उपस्थित राहतील, असे अपेक्षित होते; पण त्यांच्यासह ज्येष्ठ नेते भीमरावदादा पाटील यांनीही अनुपस्थित राहणेच पसंत केले.

Web Title: 'Bhosale' on the flakes, can not be seen anywhere!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.