‘भीमाशंकर’ विस्तारीकरणात येऊ नये

By Admin | Updated: June 27, 2016 00:35 IST2016-06-26T21:50:39+5:302016-06-27T00:35:53+5:30

उदयनराजे : प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना सूचना; पारगाव येथे प्रलंबित कामांची पाहणी

'Bhimashankar' should not be expanded | ‘भीमाशंकर’ विस्तारीकरणात येऊ नये

‘भीमाशंकर’ विस्तारीकरणात येऊ नये

खंडाळा : ‘राष्ट्रीय महामार्गावरील समस्यांसाठी पारगाव आणि खंडाळा ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा केला आहे. महामार्गालगत असणाऱ्या पुरातन भीमाशंकर मंदिर महामार्ग विस्तारीकरणात काढण्यात येऊ नये. यासाठी प्राधिकरणाकडे आपण पाठपुरावा करणार आहोत. महामार्गाच्या सहापदरीकरणात लोकांना अडचणी निर्माण होणार नाहीत याची काळजी प्राधिकरणाने घ्यावी,’ असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
पारगाव (ता. खंडाळा) येथील महामार्गाच्या प्रलंबित कामाची पाहणी व लोकांच्या अडचणी त्यांनी समजावून घेतल्या. पारगाव येथे पुरातन शिवमंदिर आहे. मात्र, रस्ता रुंदीकरणात मंदिर येत असल्यामुळे ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या जात आहेत. याबाबत पारगाव ग्रामसभेत मंदिर वाचवून महामार्ग बनवावा, असा ठराव घेण्यात आला होता. तरीही हायवे प्रशासनाने व संबंधित ठेकेदारांनी यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्याचबरोबर सेवारस्त्याचीही कामे झालेली नाहीत. त्यामुळे मंदिर वाचवण्यात यावे अथवा उड्डानपूल मोठा करण्यात यावा, अशा समस्या ग्रामस्थांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यापुढे मांडल्या. या सर्व प्रश्नांबाबत प्राधिकरण अधिकाऱ्यांशी मी स्वत: चर्चा करून मार्ग काढेन, असे आश्वासन त्यांनी दिले. ग्रामस्थांना अडचणी होणार नाहीत. याची खबरदारी घ्यायला लावणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील, सरपंच अश्विनी पवार, अशोक जाधव, भानुदास यादव, महेश गायकवाड, मारुती पवार यांसह पारगावमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

‘लोकमत’ ची दखल
पारगाव येथील भुयारी मार्गाची दुरवस्था असल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांना जाण्यासाठी मोठी अडचण होत आहे. रस्ता ओलांडण्यासाठी पर्याय नाही. यावर तोडगा काढावा, अशी तातडीने मागणी करत ‘लोकमत’ने याबाबत ‘भुयारी मार्गाची दुर्दशा’ अशी बातमी देऊन आवाज उठवला होता. हे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले.

Web Title: 'Bhimashankar' should not be expanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.