भीम-कुंती उत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:46 IST2021-09-07T04:46:59+5:302021-09-07T04:46:59+5:30
उंब्रज : शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला येथील भीम-कुंती उत्सवास सोमवारी प्रारंभ झाला. गोरज मुहूर्तावर पुत्र भीम व माता ...

भीम-कुंती उत्सवास प्रारंभ
उंब्रज : शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला येथील भीम-कुंती उत्सवास सोमवारी प्रारंभ झाला. गोरज मुहूर्तावर पुत्र भीम व माता कुंती यांच्या मूर्तीची अनोखी भेट भीममंडपात झाली.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत उंब्रज येथील भीमसेन मंडळाच्या कार्यकर्त्यानी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून उत्सवास सुरुवात केली. सकाळी येथील भीम मंडपात माता कुंतीच्या मूर्ती रथात घेऊन विराजमान होण्यासाठी परंपरेनुसार लिलाव पद्धतीने बोली बोलण्यात आली. ही बोली दीपक शेखर जाधव यांनी एकवीस हजार रुपयांनी बोलून कुंती मातेच्या मूर्ती शेजारी रथात बसण्याचा मान मिळवला.
महामुनी यांच्या घरात तयार केलेल्या कुंती मातेच्या मूर्तीचे दुपारी दीडच्या सुमारास पूजन केले. यानंतर फुलांनी सजविलेल्या रथात कुंती मातेच्या मूर्तीसह दीपक जाधव विराजमान झाले. त्यानंतर साध्या पद्धतीने व गर्दी होणार नाही याची दक्षता भीमसेन मंडळ व ग्रामपंचायत प्रशासन यांनी महामुनी यांच्या घरापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणूक भैरवनाथ मंदिरमार्गे ग्रामपंचायत इमारतीच्या रोडने बाजारात आली. यावेळी ‘भीमसेन महाराज की जय’, ‘कुंती माता की जय’च्या घोषणा दिल्या जात होत्या. मिरवणूक बाजारपेठेतून पाटण तिकाटणे येथून कॉलेज रोडला असणाऱ्या हनुमान मंदिराला प्रदक्षिणा घालून भीम मंडपात आली.
फोटो ०६उंब्रज भीम कुंती सोहळा
उंब्रज येथील शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या कुंती मातेच्या मूर्तीची सोमवारी रथातून मिरवणूक काढण्यात आली. (छाया : अजय जाधव)