भगीरथ प्रयत्नांचा अजिंक्यतारा पॅटर्न!
By Admin | Updated: January 9, 2015 00:04 IST2015-01-08T21:24:00+5:302015-01-09T00:04:07+5:30
नियमित श्रमदान : जलसंधारणाची मोठी कामे

भगीरथ प्रयत्नांचा अजिंक्यतारा पॅटर्न!
सागर गुजर- सातारा -राजा भोजच्या काळापासून सातारकरांची शान म्हणून डौलाने उभा असणारा अजिंक्यतारा दुर्लक्षाचे दुखणे सोसत होता. डोंगरावर असणाऱ्या नऊ तळ्यांमध्ये पावसाचे पाणी साठते; पण गळतीमुळे हे पाणी जास्त काळ साठून राहत नव्हते. गाजरगवताने वेढलेला किल्ल्याचा माथा बकाल आणि उदास दिसत होता. मात्र, येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली साताऱ्यातील प्रतिष्ठित मंडळींच्या गु्रपने किल्ल्याचा कायापालट केला आहे. त्यांच्याच भगिरथ प्रयत्नांतून जलसंधारणाची मोठी कामे अजिंक्यताऱ्यावर झाली.
अजिंक्यतारा किल्ल्यावरील दूरदर्शन, आकाशवाणीचे टॉवर, बीएसएनलचा टॉवर येथे वर्दळ असायची तर ऐतिहासिक स्थळे दुर्लक्षाच्या फेऱ्यात सापडली होती. गाजर गवताने माजलेल्या या परिसरात बिबट्या वावरत असल्याच्या वावड्या अधून-मधून उठतात.
किल्ल्याची ही बकाल अवस्था दूर करण्याचा मनोदय डॉ. पोळ यांनी किल्ल्यावर व्यायामासाठी जाणाऱ्या लोकांजवळ व्यक्त केला. किल्ल्यावर काय कामे करता येतील? याचा आराखडा त्यांनी मांडला. या आराखड्यानुसार कामाला सुरुवात झाली. सर्वात प्रथम गडावरील तळ्यांच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले. या तळ्यांमध्ये गाळ साठलेला होता. मोठाले दगड या तळ्यात पडले होते. किल्ल्यावरील पाणी व्यवस्था सुधारण्याची कामे या गु्रपतर्फे हाती घेण्यात आली. मंगळाई देवीच्या मंदिरानजीक असणाऱ्या सलग तळ्यांतील गाळ व दगड काढण्याची कामे सर्वप्रथम हाती घेण्यात आली.
डॉ. पोळ व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी अजिंक्यताऱ्यावरील तळ्यांमधील गाळ काढून त्यातील गळती रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या. त्यांनी महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून तळ्यांच्या कामासाठी दोन कोटींचा निधी मंजूर केला. त्यापैकी ३६ लाख रुपये खर्चून तळ्याातील गाळ काढून गळती काढण्यात आली.
दोन पुलांच्या मध्ये एक पूल तयार करण्यात आला. पर्यटकांसाठी ही आकर्षक अशी पर्वणी ठरली; परंतु तळ्यांमध्ये मोठा पाणीसाठा झाला आहे. पावसाळा संपून चार महिने उलटले असले तरीही अद्याप या तळ्यांमध्ये पाणी साठलेले पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, हे पाणी अत्यंत स्वच्छ आहे.
‘हरिओम’ ने मिळते प्रेरणा
किल्ल्यावर श्रमदानासाठी जाणारा या गु्रपचा ‘हरिओम’ हा कोडवर्ड आहे. याचा उच्चार करताच त्यांच्यामध्ये एक ऊर्जा जागृत होते. कष्टकरी हातही डॉक्टर, इंजिनिअर्स अशा वेलसेटेड मंडळींचे आहेत. जलक्रांतीचं त्यांनी पाहिलेले स्वप्न ते सत्यात उतरवत आहेत.