भाजीमंडई की कोळसाखाण?
By Admin | Updated: November 14, 2014 23:22 IST2014-11-14T22:34:36+5:302014-11-14T23:22:40+5:30
गैरसोयीवर हायटेक उपाय : डोक्याला ‘हेडटॉर्च’ अन् मेणबत्त्यांच्या प्रकाशात ताजेपणाची पारख

भाजीमंडई की कोळसाखाण?
सातारा : येथील पोवई नाका भाजी मंडईतील विक्रेते गेल्या अनेक महिन्यांपासून सायंकाळच्या वेळी अंधारातच भाजीविक्रीचा व्यवसाय करीत आहे. यामुळे व्यवसायात येणारी अडचण दूर करण्यासाठी आता विक्रेतेही ‘हायटेक’ बनल्याचे दिसून येत आहे. खाणीमध्ये वापरण्यात येणारी ‘हेडटॉर्च’ डोक्याला बांधून तर कोणी मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशात भाजीविक्री करताना दिसत आहे.
समर्थ भाजीविक्री मंडईला लागून असणाऱ्या पोवई नाका भाजी मंडईत सेवा-सुविधांची वानवा आहे. या मंडईत बाहेरून व्यवसायासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. या ठिकाणी विजेची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे काही व्यावसायिकांना रात्रीच्या वेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे ग्राहकदेखील या मंडईकडे पाठ फिरविताना दिसतात. परिणामी, अंधारामुळे व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी स्वत: व्यावसायिकांनी वेगवेगळ्या उपाययोजना आखल्याचे दिसून येत आहे. काही व्यावसायिक बॅटरीचा वापर करताना दिसत आहेत, तर काहीजण चक्क मेणबत्तीच्या प्रकाशात भाजीविक्री करीत आहे. आता याही पुढे जाऊन काही व्यावसायिकांनी चक्क खाणीमध्ये वापरण्यात येणारी ‘हेडटॉर्च’ डोक्याला बांधून भाजीविक्री करण्यास प्रारंभ केला आहे. याचे ग्राहकांना देखील कुतूहल वाटत आहे.
या नव्या उपाययोजनेमुळे व्यावसायिकांचे नुकसान काही प्रमाणात का होईना टळत आहे. तसेच अंधाराची समस्याही दूर होत आहे. असे असले तरी प्रशासनामार्फत याठिकाणी विजेची पुरेशी सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजीविक्रेत्यांची आहे. (प्रतिनिधी)
ग्राहकांचीही होते तारांबळ
पोवई नाका भाजी मंडईतील सगळ्याच व्यावसायिकांना उजेडात बसता येत नाही. त्यामुळे काही जणांना अंधारात व्यवसाय करावा लागतो. याचा व्यवसायावर परिणाम होतो. काही विक्रेते रात्रीच्या वेळी मेणबत्तीचा वापर करतात. परंतु मेणबत्तीचा उजेड पुरेसा नसल्याने व्यावसायिक व ग्राहक दोघांची तारांबळ होताना दिसते.
गेली अनेक दिवस मेणबत्तीच्या उजेडात भाजीविक्रीचा व्यवसाय करीत आहे. दिवसा कसलीच अडचण येत नाही; मात्र रात्री मोठी अडचण निर्माण होते. हवेमुळे मेणबत्ती सारखी विझत असते. त्यामुळे मेणबत्ती लावायची की ग्राहकांकडे पाहायचे, अशी द्विधा मन:स्थिती होते.
- अविनाश सुतार, भाजी विक्रेता
मेणबत्तीच्या प्रकाशात काहीं विक्रेत्यांना विक्री करावी लागत आहे.
पोवई नाक्यातील भाजीमंडईत काही भाजीविक्रेते खाणीमध्ये वापरण्यात येणारी ‘हेडटॉर्च’ डोक्याला बांधून व्यवसाय करत आहेत.