भैरोबाचा डोंगर हाच माझा गॉडफादर!
By Admin | Updated: January 4, 2015 00:51 IST2015-01-04T00:48:59+5:302015-01-04T00:51:13+5:30
सयाजी शिंदे : सातारकरांशी साधलेल्या मुक्तसंवादात उलगडला खडतर प्रवास

भैरोबाचा डोंगर हाच माझा गॉडफादर!
सातारा : ‘वेळेकामथी गावच्या मातीत वाढलो. ‘खोट्याच्या सावलीलाही उभा राहू नको,’ या माझ्या वडिलांच्या सल्ल्यानुसार आतापर्यंत वागत राहत राहिलो. या विचारांच्या शिदोरीमुळेच मी अजूनही साधेपण जपून आहे. कॉलेज जीवनात कलेच्या प्रांगणात प्रवेश करेन, असे वाटलेही नव्हते. साताऱ्यातल्या भैरोबाच्या डोंगर माझा गॉडफादर ठरला. या डोंगराच्या साक्षीनंच मी संवाद कौशल्ये आत्मसात केली,’ असे उद्गार प्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.
ग्रंथमहोत्सवात शनिवारी प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे व नितीन केळकर यांनी त्यांच्या ‘मुक्काम पोस्ट सातारा’ या विषयाच्या अनुषंगाने मुक्तसंवाद साधला. कवी रामदास फुटाणे, एसटीचे विभाग प्रमुख धनाजीराव थोरात, शिरीष चिटणीस, प्रदीप कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सिनेसृष्टीत प्रवेश करण्याआधीच्या जीवनाचा वेध घेत ते म्हणाले, ‘शालेय शिक्षण घेतल्यानंतर मी सातारमधील महाविद्यालयात प्रवेश केला. घरची परिस्थिती बेताची. त्यात आमची एकरभर जमीन प्रकल्पात गेलेली. ती जमीन अद्यापही मिळालेली नाही. अशा परिस्थितीत मोठ्या प्रसिद्धीची हाव असण्याचे कारणच नव्हते. त्यामुळे महाविद्यालयात असतानाच मला व वेळेकामथीतल्या आणखी तीन मित्रांना शासकीय खात्यात कंत्राट पद्धतीवर वॉचमनची नोकरी मिळाली. दिवसभर कॉलेज व रात्री नोकरी, असा नित्यक्रम सुरू होता. कलेची आवड तर होतीच. अभिनव ग्रुपचे सुनील कुलकर्णी यांच्यासोबत ‘घोटभर पाणी...’या नाटकाचे प्रयोग सुरू केले.
वेळेकामथीमध्ये या नाटकाचे प्रयोग करून गावात एकी निर्माण केली. ‘झुलवा’ हे माझं पहिलं नाटक. त्यात मी केलेला तृतीयपंथी व्यक्तीचा रोल माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. हे नाटक करत असताना तृतीयपंथीयांचे प्रश्न मांडताना डोळ्यांत आपोआपच अश्रू येत असत.’
तेंडुलकरांच्या सखाराम बार्इंडरनं आयुष्याला घडवलं, असंही शिंदे यावेळी म्हणाले. शिरीष चिटणीस यांनी साताऱ्यात नाट्यसंमेलन घेण्याच्या अनुषंगाने आपण संयोजकाची भूमिका बजवावी, अशी विनंती केली. त्यावर ‘नाट्य गु्रप आधी तयार करा, नंतर मग संमेलनाचं बघू,’ असे उत्तर शिंदे यांनी दिले. (प्रतिनिधी)