उदंड जाहले बोगस आजी-आजोबा
By Admin | Updated: August 30, 2015 00:13 IST2015-08-30T00:10:36+5:302015-08-30T00:13:18+5:30
तीनशेहून अधिक कार्ड बोगस : ज्येष्ठ नागरिक, अपंग सवलत योजनेत एसटीची फसवणूक

उदंड जाहले बोगस आजी-आजोबा
जगदीश कोष्टी ल्ल सातारा
राज्य परिवहन महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिक, अंध-अपंगांबरोबर वेगवेगळ्या स्तरांतील लोकांना प्रवासात सलवत दिली जाते. या सवलतींचा लाभ मिळावा व कमी खर्चात फिरायला मिळावे म्हणून बनवेगिरी सुरू झाली आहे. यामध्ये तीनशेहून अधिक बोगस कार्ड सापडले असून, त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे.
राज्य परिवहन महामंडळ सामाजिक जाणिवेतून सवलती देत असते. वास्तविक पाहता राज्य शासनच हे निर्णय घेत असते. त्यांची अंमलबजावणी एसटी महामंडळ करत असते. यामध्ये विद्यार्थी सवलत, विद्यार्थिनींसाठी अहिल्याबाई होळकर योजना, ज्येष्ठ नागरिक, राष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय पुरस्कार विजेते व्यक्ती, पत्रकार, अंध, अपंग, कुष्ठरोग, क्षयरोग असलेल्या व्यक्तींसाठी या योजना आहेत. या प्रत्येक योजनेत विशिष्ठ प्रकारची सवलत दिली जाते. यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर आरोग्य, समाजकल्याण, महसूल अधिकाऱ्यांच्या सहीने यासंदर्भात ओळखपत्र दिले जाते. त्यानंतरच लाभ घेता येतो.
या योजनांमध्ये सर्वाधिक लाभ ज्येष्ठ नागरिक योजनेतून घेतला जातो. जुलैमध्ये सातारा आगारातून १ लाख ८५ हजार ४७५ व्यक्तींनी लाभ घेतला होता. यासाठी विशेष काही करण्याची गरज नसून ६५ वर्षे असल्याचे कोणताही पुरावा वाहकाला दाखविल्यास पन्नास टक्के पैसे देऊन प्रवास करता येतो. यामध्ये राज्य किंवा केंद्र सरकारने दिलेला कोणताही ओळखीचा पुरावा, निवृत्तीपत्र, आधारकार्ड, मतदानकार्ड दाखविले तरी चालते. त्या खालोखाल अपंगांच्या सवलतीचा वापर होतो. सातारा आगारातून जुलैमध्येच तीस हजार लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.
मंत्री दिवाकर रावते यांनी बोगस कार्डसंदर्भातील विषयाला तोंड फोडल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाने अशा सवलतींचा लाभ बोगस ओळखपत्रांद्वारे घेत असल्यास त्यांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार ही मोहीम राबविली होती. सातारा बसस्थानकातील विनाथांबा खिडकीत प्रवासासाठी ज्येष्ठ नागरिकांनी दाखविलेल्या ओळखपत्रांची पाहणी केली असता ते बोगस असल्याचे निष्पन्न झाले. मतदार ओळखपत्रावर कृष्णधवल छायाचित्र असताना काहीतर चक्क बनावट ओळखपत्र तयार केले आहे. कृष्णधवलऐवजी रंगीत छायाचित्र वापरल्याने पर्दाफाश झाला. यामध्ये दहा-पंधरा वर्षांपर्यंत वय वाढवून दाखविण्यात आले आहे. अपंग योजनेतही कोणते तरी बनावट कागदपत्र आणून लाभ घेतला जात होता. मात्र, अनेकांचे अपंगत्व दिसतही नाही. त्यामुळे असे ओळखपत्र जप्त करण्यात आले आहेत. याची संख्या तीनशेहून अधिक आहे.