दोघेजण सोडून बाकीचे मागे जा
By Admin | Updated: October 18, 2014 23:26 IST2014-10-18T23:26:11+5:302014-10-18T23:26:11+5:30
न्यायाधीशांचा आदेश : पावणेदोन तास न्यायालयात निरव शांतता; कार्यकर्त्यांची प्रचंड घालमेल

दोघेजण सोडून बाकीचे मागे जा
सातारा : महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांच्या खूनप्रकरणाचा निकाल शनिवारी जाहीर होणार असल्याने न्यायालय अगदी खचाखच भरले होते. निकाल लागेपर्यंत प्रत्येकाच्या ह्दयात धकधक होत होती...न्यायाधीश केव्हा निकाल सांगणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या... तब्बल पावणेदोन तासानंतर न्यायाधीशांनी निकाल सांगण्यास सुरुवात केल्यानंतर सगळ्यांचे कान टवकारले.
ठीक सकाळी अकरा वाजता न्यायाधीश आसनस्थ झाले. हॉलच्या दरवाजाजवळ दहा-बारा पोलीस उभे होते. आतमध्ये प्रवेश करणाऱ्यांना तपासून सोडत होते. उदयसिंह पाटील यांचे कार्यकर्तेही अगोदरच हॉलमध्ये येऊन बसले होते. न्यायाधीशांनी निकालपत्राचे सविस्तर डिक्टेशन सुरू केले. त्यावेळी उपस्थितांची घालमेल सुरू झाली. कोणत्याही क्षणी निकाल लागण्याची शक्यता होती. अधून-मधून कार्यकर्त्यांची आणि वकिलांचीही चुळबूळ सुरू व्हायची. न्यायाधीश आणि त्यांच्या शेजारी असणारे लिपिक निकालाचा सारांश लिहिण्यात मग्न होेते.
काही आरोपी अस्वस्थ होत होते. त्यामुळे त्यांना पाण्याची बाटली द्यावी लागत होती. निकाल जाहीर होण्यास जसजसा वेळ लागत होता, तस-तशी उत्कंठा शिगेला पोहोचत होती. तब्बल पावणेदोन तासानंतर अखेर न्यायाधीशांनी ‘सर्व आरोपींना पुढे आणा,’ असे पोलिसांना सांगितले. न्यायाधीशांसमोर संशयित आरोपी उभे राहिले. त्यानंतर न्यायाधीशांनी निकाल वाचण्यास सुरुवात केली. न्यायाधीशांनी सर्व आरोपींची नावे वाचून दाखविल्यानंतर ‘आरोपी नंबर एक सागर परमार, दोन हमीद शेख हे दोषी असून, उर्वरित नऊजण निर्दोष आहेत,’ असे जाहीर केले. त्यावेळी ज्यांची सुटका झाली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आंनद द्विगुणीत झाला. निर्दोष सुटका झालेल्या आरोपींना न्यायाधीशांनी पाठीमागे बसण्यास सांगितले. मात्र, आरोपी सागर परमार आणि हमीद शेखला न्यायाधीशांनी पुढे उभे राहण्यास सांगितले. या दोघांना किती शिक्षा होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले.
न्यायाधीशांनी शिक्षा जाहीर करण्यास सुरुवात केली. दोघांनाही वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येत असल्याचे न्यायाधीशांनी सांगताच शांतता पसरली. न्यायालयाच्या बाहेर उदयसिंह यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला. पोलिसांनी त्यांना अटकाव करून न्यायालयाच्या बाहेर काढले. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. (प्रतिनिधी)