जयंतरावांमुळे मंत्रिपद हुकले असाव
By Admin | Updated: January 23, 2015 00:46 IST2015-01-22T23:14:17+5:302015-01-23T00:46:10+5:30
राजू शेट्टी : ...तर आंदोलनातील नुकसानीला शासन जबाबदारे

जयंतरावांमुळे मंत्रिपद हुकले असाव
सांगली : आंदोलन करणारे मंत्रिमंडळात नसावेत, असे सरकारला वाटत असावे किंवा जयंतरावांच्या इशाऱ्याने आमचे मंत्रिपद हुकले असावे, असा उपहासात्मक टोला खासदार राजू शेट्टी यांनी आज, गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला.
ते म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटना जशी आहे तशीच आहे. आम्हाला बदलण्याची गरज नाही. आम्ही सरकारमध्ये सहभागी नसून सरकारबद्दल आम्हाला केवळ सहानुभूती आहे. गतवेळच्या सरकारपेक्षा हे सरकार बरे आहे; पण ‘अच्छे दिन’ येणार, असा भाबडा विश्वास बाळगण्यात अर्थ नाही. शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन अजूनही यायचे आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत या सरकारनेही दखल घेतली नाही, तर आम्हाला आंदोलन करावे लागेल. त्यावेळी सरकार कोणाचे आहे, हे आम्ही पाहणार
नाही. एफआरपीप्रमाणे कारखाने दर देणार नसतील, तर शासनाने त्यांची गोदामे सील करावीत आणि
फौजदारी दाखल करावी, अन्यथा गोदामे आम्हाला बंद करावी लागतील. अशावेळी जी परिस्थिती उद्भवेल व जे नुकसान होईल,
त्यास शासन जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला. एफआरपीसाठी पुरेसा वेळ आम्ही सरकार आणि कारखानदारांना दिला आहे. आता त्यांनी एफआरपीप्रमाणे दर द्यावा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. शासनाने खरेदी कर माफ केला आहे. त्याशिवाय इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कारखान्यांच्या आर्थिक उत्पन्नातही भर पडणार आहे. साखर निर्यातीबाबतही लवकरच केंद्र शासनाचा निर्णय होईल. त्यावेळी किमान २० लाख टन साखर निर्यात झाली, तरी देशातील साखरेचा शिल्लक
साठा आणि मागणी यांचे संतुलन राहील. आमच्यादृष्टीने साखर कारखानदारांसाठी शासनाने जे करायचे ते केले आहे. आता शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे दर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
(प्रतिनिधी)
जयंतरावांवर हल्लाबोल
जयंत पाटील यांच्या आरोपांबाबत ते म्हणाले की, जयंतरावांनी अगोदर सांगितल्याप्रमाणे तीन हजार रुपये दर द्यावा. त्यांनी दर दिल्यानंतर खुशाल माझा जिल्हाभर निषेध करावा. जयंतरावांच्या इशाऱ्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंत्रिपद हुकले असावे, असे मत व्यक्त केल्यानंतर शेट्टी यांनी, याबाबत अधिक भाष्य करण्यास नकार दिला.
पृथ्वीराज चव्हाणांनी काय दिवे लावले?
आम्ही आंदोलनाचे नाटक करतो, असा आरोप करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या कालावधीत काय दिवे लावले, हे आधी जाहीर
करावे, असा पलटवार खासदार शेट्टी यांनी केला. आघाडी सरकारच्या
काळात ऊस दराच्या प्रश्नावर पंतप्रधानांची भेटही होऊ शकत नव्हती. आताच्या सरकारमध्ये लगेच पंतप्रधानांशी चर्चाही होते. दोन्ही सरकारमध्ये हा फरक आहे.
पवारांनी बैठक का टाळली?
एफआरपीबाबत पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीला अजित पवार यांनी जायचे टाळले. विरोधी पक्षातील सक्षम नेत्याने या बैठकीला उपस्थित राहावे, अशी अपेक्षा असताना, त्यांनी जाणीवपूर्वक ही बैठक टाळून इस्लामपुरातील सभेला जाणे पसंत केले. यासाठीही जयंतरावांनीच इशारा केला होता का, असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.