वाई एमआयडीसीत दोघांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:41 IST2021-03-17T04:41:04+5:302021-03-17T04:41:04+5:30
वाई : शहरातील रविवार पेठ येथे पूर्ववैमनस्यातून दोघांवर हल्ला करण्यात आला. एकावर धारधार शस्त्राने, तर दुसऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात ...

वाई एमआयडीसीत दोघांना मारहाण
वाई : शहरातील रविवार पेठ येथे पूर्ववैमनस्यातून दोघांवर हल्ला करण्यात आला. एकावर धारधार शस्त्राने, तर दुसऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. धारदार शस्त्राने वार केल्याने अक्षय नंदकुमार निकम हा गंभीर जखमी झाला असून, त्याला सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर धीरज दगडे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वाई औद्योगिक वसाहतीतील चांदणी चौकातील हॉटेलात ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, अक्षय निकम व धीरज दगडे हे दोघे शहरातील औद्योगिक वसाहत येथील चांदणी चौकातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्या ठिकाणी अमन शेख, संग्राम शिर्के, ऋतिक गाढवे (सर्व, रा. बोपर्डी) हे तिघे जण आले. त्यांनी अक्षय निकम याला ‘तू मोठा भाई झाला आहेस. तुला खूप मस्ती आली, आता याची मस्ती पुरेपूर जिरवू या,’ असे म्हणत अक्षय व धीरज दगडे या दोघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नंतर या तिघांनी धारदार शस्त्राने वार करून अक्षयला गंभीर जखमी केले. अक्षय निकम काही महिन्यांपूर्वी रविवार पेठेत झालेल्या टोळीयुद्धात सहभागी होता. त्यातून पुढे बोपर्डी येथील युवकांशी त्याचा वाद झाला होता. या वादातून सोमवारी रात्री अक्षयवर हा हल्ला करण्यात आल्याचे समजते. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे करत आहेत.