कोरोना संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणा सतर्क ठेवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:39 IST2021-03-17T04:39:49+5:302021-03-17T04:39:49+5:30
दौलतनगर, ता. पाटण येथे तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांची तातडीची आढावा बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी श्रीरंग ...

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणा सतर्क ठेवा!
दौलतनगर, ता. पाटण येथे तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांची तातडीची आढावा बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार योगेश टोम्पे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.बी. पाटील, पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. चंद्रकांत यादव, ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. दत्तात्रय डोंगरे, पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे, ढेबेवाडीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, मल्हारपेठचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अजित पाटील, कोयनेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सी.एस. माळी उपस्थित होते.
या बैठकीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील कोरोना रुग्णांच्या संदर्भात आढावा घेतला. तालुक्यात ३३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. विहे गावात कोकणामध्ये लग्नासाठी गेलेल्यांमध्ये पहिले चार रुग्ण सापडले. त्यानंतर आणखी १० रुग्ण आढळले असून बाधितांची संख्या वीसपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विहे गावात ७२ ग्रामस्थांच्या चाचण्या घेतल्या आहेत. या गावात आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या असल्याचे सर्व अधिकाऱ्यांनी सांगितले.
- चौकट
अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
१) मास्क वापरणे सक्तीचे करा
२) कोरोना चाचण्या वाढवा
३) गावागावात जनजागृती करा
४) दक्षता घेण्याच्या सूचना करा
५) डिस्टन्सिंग न पाळणाऱ्यांवर कारवाई करा
६) गर्दीवर नियंत्रण ठेवा
- चौकट
विवाह समारंभ, बाजारपेठांवर लक्ष ठेवा!
सध्या विवाह समारंभ मोठ्या प्रमाणात होत आहेत. परवानगी घेऊन ते होत असले तरी त्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोठमोठे बाजार तसेच बाजारपेठांमध्ये गर्दी होऊन नियमांचे उल्लंघन होऊ शकते. याचीही काळजी यंत्रणेकडून घेण्यात यावी. गर्दीवर नियंत्रण ठेवत कोरोनावर मात करण्याचे आवाहन शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात यावे, अशी सूचनाही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
- चौकट
लॉकडाऊन नको असेल तर मास्क वापरा!
कोरोना संपला अशी मानसिकता निर्माण झाली आहे. मात्र, कोरोना रुग्णांच्या संख्येत आता वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. लॉकडाऊनची वेळ परत येऊ नये, यासाठी आताच काळजी घ्यावी. बाहेर फिरणारे नागरिक मास्क हनुवटीवर बांधत आहेत. पोलीस दिसले की, नाकावर आणि तोंडावर घेत आहेत. मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करा, असेही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले.
फोटो : १६केआरडी०१
कॅप्शन : दौलतनगर, ता. पाटण येथे आयोजित आढावा बैठकीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.