सभापती व्हायचे होते; झाल्या आरोपी!

By Admin | Updated: September 18, 2014 23:26 IST2014-09-18T23:18:49+5:302014-09-18T23:26:23+5:30

बोगस जात प्रमाणपत्र : पाटण पंचायत समिती सदस्या सुमन जाधवांवर गुन्हा

To be a speaker; Accused! | सभापती व्हायचे होते; झाल्या आरोपी!

सभापती व्हायचे होते; झाल्या आरोपी!

पाटण : नुकत्याच झालेल्या सभापती निवडीत देसाई गटाच्या पंचायत समिती सदस्या सुमन जाधव यांनी ओबीसी (कुणबी) जातीचे बोगस प्रमाणपत्र दाखविल्याबाबत पाटणकर गटाच्या विद्यमान सभापती संगीता गुरव यांनी पाटण पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. ठकबाजी करून खोटी सही व शिक्क्याचा वापर केल्याप्रकरणी सुमन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. -पाटणकर गटाचे पंचायत समितीचे सदस्य राजेश पवार यांनी या बनावट जात प्रमाणपत्राचा पाठपुरावा करताना कोल्हापूर येथील विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज केला होता. या अर्जाला उत्तर देताना विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी केंद्राच्या सदस्य सचिवांनी / राजेश पवार यांना कळविले की, ‘८५०८०४’ या क्रमांकाचे वैधता जात प्रमाणपत्र संगणकीय माहितीनुसार फैजअहमद मुबारक मुलाणी या अर्जदारास निर्गमित केले आहे. मात्र, मारुल हवेली गणाच्या पंचायत समिती सदस्या सुमन श्रीमंत जाधव (रा. दिवशी बुद्रुक, ता. पाटण) यांच्याकडील त्याच क्रमांकाचे प्रमाणपत्र बनावट असून, त्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीकडे केलेला अर्ज परिपूर्ण नसल्याने तो स्वीकारलेला नाही.
त्यानुसार सुमन जाधव यांच्याविरोधात सभापती संगीता गुरव यांनी फिर्याद दिली. काल, बुधवारी रात्री त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक हणमंत गायकवाड तपास करीत आहेत. दरम्यान, ‘सत्तेसाठी देसाई गट कोणत्याही थराला जाऊ शकतो. आताचे हे जिवंत उदाहरण असून, संघटितपणे केलेल्या या प्रकाराचा शोध घेऊन दोषींवर कारवाई करावी,’ अशी मागणी सभापती गुरव यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच ‘बोगस प्रमाणपत्र सादर करून काही राजकीय मंडळींनी ओबीसी वर्गाची प्रतारणा केली आहे,’ असे आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी म्हटले आहे.
चिठ्ठीवर झाली होती निवड !
पाटण पंचायत समितीचे सभापतिपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव होते. त्यानुसार पाटणकर गटाकडे संगीता गुरव आणि मिलन सय्यद या दोन महिला सदस्या होत्या; तर देसाई गटाकडे ओबीसी आरक्षणातील एकही महिला सदस्या नव्हती. तरीही सर्वसाधारण प्रवर्गातील सुमन जाधव यांनी बोगस जात प्रमाणपत्र मिळवून सभापतिपदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. मात्र, नशिबाने चिठ्ठीवर झालेल्या निवडीत पाटणकर गटाच्या गुरव या सभापती झाल्या होत्या.

Web Title: To be a speaker; Accused!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.