कोरोनात काळजी घ्या; जीवघेणा ‘टेन्शन’ नको!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:39 IST2021-04-20T04:39:25+5:302021-04-20T04:39:25+5:30
कऱ्हाड : कोरोनाने होणारा मृत्यू धक्कादायक असला तरी कोरोनामुक्तीचा वाढता टक्काही दिलासा देणारा आहे. कऱ्हाडचा विचार करता तालुक्याचा ‘रिकव्हरी ...

कोरोनात काळजी घ्या; जीवघेणा ‘टेन्शन’ नको!
कऱ्हाड : कोरोनाने होणारा मृत्यू धक्कादायक असला तरी कोरोनामुक्तीचा वाढता टक्काही दिलासा देणारा आहे. कऱ्हाडचा विचार करता तालुक्याचा ‘रिकव्हरी रेट’ ८८.२५ टक्के असून मृत्यूदर २.९८ टक्क्यांवर आहे. त्यातही मृत्यू होण्यामागे इतर आजार व नाहक भीती या कारणांचाही समावेश असून फक्त कोरोनानेच मृत्यू होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे.
कोरोनाची दुसरी लाट वेगवान आहे. संक्रमण कित्येक पटींनी वाढले आहे. त्यामुळे साहजिकच सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. प्रत्येकाच्या मनात चिंतेचे काहूर असून कोरोनाशी लढायचं कसं, हा प्रश्न प्रत्येकाला सतावतोय. या रोगाविषयी सुरूवातीपासूनच मोठी भीती आहे. बदलता स्ट्रेन्थ, बदलती लक्षणे, अनिश्चित उपचारपद्धती यामुळे गोंधळाची स्थिती आहे. अद्यापही हा गोंधळ कमी झालेला नाही. काहीवेळा ज्याला कसलीच लक्षणे नाहीत त्याचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ येतो. तर काहीवेळा एका लॅबचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ तर दुसऱ्या लॅबचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याचीही शेकडो उदाहरणे आहेत. एकूणच कोरोनाविषयी तर्क लावणे अथवा ठोसपणे काहीही सांगणे सध्यातरी मूर्खपणाचे आहे.
कोरोनाने मृत्यू ओढावू शकतो, हे जरी सत्य असले तरी कोरोना हा ‘टेन्शन’चा नव्हे तर चिंतेचा विषय आहे, हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे. काळजी घेतल्यास, मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्यास आणि प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळल्यास आपण कोरोनापासून दूर राहू शकतो.
- चौकट
रिकव्हरी रेट : ८८.२५%
अॅक्टिव्ह रेट : ८.५६%
मृत्यू दर : २.९८%
- चौकट
लेखाजोखा
तालुक्याची लोकसंख्या : ५८७४११
झालेल्या कोरोना चाचण्या : ८३०५०
- चौकट
बाधितांचे प्रमाण
लोकसंख्येच्या तुलनेत : २.०६%
चाचणीच्या तुलनेत : १४.६०%
- चौकट
मृत्यू ३६१; पैकी व्याधीग्रस्त १९९
कऱ्हाड तालुक्यात सोमवार अखेर ३६१ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, त्यापैकी १९९ रुग्ण मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, किडनीसह इतर आजार असणारे ‘कोमॉर्बिड’ म्हणजेच व्याधीग्रस्त होते. तसेच रुग्णांमधील भीतीही काहीवेळा मृत्यूला कारणीभूत ठरत असल्याचे उंब्रजचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार यांनी सांगितले.
- चौकट
लसीकरणाचा भक्कम आधार
एकीकडे कोरोना संक्रमण वाढत असले तरी दुसरीकडे लसीकरणाने वेग घेतला आहे. तसेच आरोग्य यंत्रणेकडे पूर्वानुभव आणि गतवर्षीच्या तुलनेत चांगल्या सुविधा उपलब्ध असल्याने ही बाब संक्रमण आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी भक्कम आधार ठरत आहेत.
- कोट
तत्काळ निदान, तातडीने उपचार!
त्रास झाला, कोरोनाची लक्षणे वाटली तर तातडीने चाचणी करून घ्यावी. अनेकवेळा रुग्ण लक्षणे लपवतात. अंगावर काढतात. त्यामुळे उशिरा निदान होऊन उपचारालाही विलंब होतो. परिणामी, मृत्यू ओढवतो. तत्काळ निदान, तातडीने उपचार हा कोरोनामुक्तीचा कानमंत्र आहे.
- डॉ. संगीता देशमुख
तालुका वैद्यकीय अधिकारी
- चौकट
त्रिसूत्री लक्षात ठेवा!
मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्स ही कोरोनापासून बचावाची त्रिसूत्री आहे. त्याचा प्रत्येकाने अवलंब करावा, असे आवाहन इंदोलीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता माने यांनी केले आहे.
- चौकट
तातडीने चाचणी, वेळेत उपचार!
कोरोना झालाच तरी घाबरण्याचे कारण नाही. लक्षणे जाणवताच तातडीने चाचणी आणि वेळेत उपचार करून घेतल्यास कोरोना बरा होऊ शकतो, असे कालेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र यादव यांनी सांगितले.
फोटो : १९केआरडी०१
कॅप्शन : प्रतीकात्मक