सावधान.. घाटातून जाताना अकस्मात कोसळेल दरड !
By Admin | Updated: July 4, 2016 00:04 IST2016-07-04T00:04:00+5:302016-07-04T00:04:00+5:30
मांढरदेव, यवतेश्वर घाटात वाहतूक ठप्प : पर्यटकांच्या वाहनांना अपघाताचा धोका

सावधान.. घाटातून जाताना अकस्मात कोसळेल दरड !
पेट्री : सातारा-कास रस्त्यावरील यवतेश्वर घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. रविवारी सकाळी पुन्हा दरड कोसळली. यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. सततच्या दरडी कोसळण्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
कास परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शनिवारी पहाटे दरड कोसळली होती. त्यानंतर रविवारी दोन ते तीन ठिकाणी दरडी कोसळल्या असल्याने वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, पर्यटक व बसमधील प्रवाशांनी दरड हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
जिल्ह्यातील बोरणे, यवतेश्वर, मांढरदेव, पसरणी घाटात दरडी कोसळण्याच्या घटणा नेहमी घडत असतात. मात्र, वेळी दखल घेतली नसल्याचे दिसत आहे. (वार्ताहर)
मांढरदेव घाटात महाकाय दगड कोसळला
मांढरदेव : वाई-मांढरदेव घाट रस्त्यात शनिवारी मध्यरात्री महाकाय दगड कोसळला. सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘जेसीबी’च्या साह्याने हा दगड हटविला आहे. यामुळे वाहतूक पूर्ववत झाली. दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
वाई-मांढरदेव रस्त्यात आठ किलोमीटर अंतराचा घाटरस्ता आहे. या घाटात अनेक ठिकाणी अवघड वळणे आहेत. पावसाळा सुरू होताच घाटात डोंगरातील दगड, माती झाडाच्या मुळ्या रस्त्यावर येतात. मांढरदेव उंचीवर असल्याने येथे पावसाचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे माती मोकळी होऊन दरड कोसळून अपघात होण्याचा धोका संभावतो. (वार्ताहर)